News Flash

फ्रान्समध्ये अध्यक्ष निवडीसाठी मतदान

देशातील ६६,५४६ मतदान केंद्रांवर रविवारी सकाळी ६ वाजता मतदानाला सुरुवात झाली.

फ्रान्समध्ये रविवारी अध्यक्षीय निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाले. या वेळी उदारमतवादी उमेदवार इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी उत्तर फ्रान्समधील ल टॉके येथे मतदान केले.

मॅक्रॉन आणि ल पेन यांचे भवितव्य पणाला; निकालावर युरोपची राजकीय दिशा ठरणार

फ्रान्समध्ये रविवारी अध्यक्ष निवडीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या नॅशनल फ्रंट पक्षाच्या नेत्या मेरी ल पेन आणि ‘एन मार्च’ पक्षाचे मध्यममार्गी उमेदवार इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात मुख्य लढत होत आहे. या दोन्ही विचारसरणींमध्ये सध्या मोठा संघर्ष असून या निवडीवर युरोपच्या राजकारणाचे भवितव्य ठरू शकते. सध्या समाजवादी पक्षाचे फ्रान्सवां ओलांद हे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत.

देशातील ६६,५४६ मतदान केंद्रांवर रविवारी सकाळी ६ वाजता मतदानाला सुरुवात झाली. फ्रान्समध्ये सध्या ४८ दशलक्ष नोंदणीकृत मतदार आहेत. अनेक मतदारांनी रविवारी खराब हवामान असूनही मतदानासाठी केंद्रांबाहेर रांगा लावल्या होत्या. दोन्ही पक्षांसाठी कुंपणावरच्या मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे हे मोठे आव्हान होते. बहुतांश केंद्रांवर सायंकाळी ५ वाजता, तर काही ठिकाणी ६ वाजता मतदान बंद होणार होते. त्यानंतर हळूहळू मतदानाचे कौल हाती येऊ लागतील.

मॅक्रॉन निवडून आल्यास त्यांच्या समर्थकांनी पॅरिसमधील लॉव्र एस्प्लनेड या ठिकाणी जल्लोषाची तयारी केली होती. मात्र तेथे संशयास्पद वस्तू आढळल्याने पोलिसांनी ते ठिकाण रिकामे केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर शुक्रवारी मॅक्रॉन यांच्यासंबंधी गुप्त कागदपत्रे विकिलिक्स व अन्य संकेतस्थळांनी प्रसिद्ध केल्याने तणावात भर पडली आहे. त्याच्या मतदारांवर कसा परिणाम होतो हे पाहणेही उद्बोधक ठरेल.  युरोपच्या राजकारणात सध्या उदारमतवादी आणि कडव्या उजव्या व राष्ट्रवादी विचारसरणींमध्ये मोठा संघर्ष आहे. ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा (ब्रेग्झिट) निर्णय घेतल्याने अन्य देशांतही त्याचे पडसाद उमटू लागले आहे. सीरिया आणि इराकमधून गेल्या काही वर्षांत युरोपमध्ये मोठय़ा प्रमाणावर निर्वासितांचे लोंढे आले आहेत. त्यांना सामावून घेण्यावरून अनेक देशांच्या नेत्यांमध्ये तेढ आहे.

ग्रीस व अन्य देशांत अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. बेरोजगारी वाढत आहे.  त्यामुळे नागरिकांच्या भावना प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आहेत. एकत्रित युरोपीय महासंघ आणि मुक्त अर्थव्यवस्था झुगारून देश पातळीवर आपापले प्रश्न सोडवण्याच्या बाजूने जनमत बनत आहे. यामुळे उदारमतवाद मागे पडून नवराष्ट्रवादी विचारसरणी उचल खात आहे. मॅक्रॉन हे उदारमतवादी विचारांचे प्रतिनिधित्व करत असून ल पेन या उजव्या राष्ट्रवादी गटाचे प्रतिनिधित्व करतात. गेल्या महिन्यात पार पडलेल्या  निवडणुकीच्या पहिल्या फेरीत मॅक्रॉन यांनी ल पेन यांच्या विरोधात ६२ टक्के विरुद्ध ३८ टक्के अशी मतांची आघाडी होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 2:10 am

Web Title: voting in france for the second round of the presidential election
Next Stories
1 सतारीचे सूर हरपले उस्ताद रईस खान यांचे निधन
2 ‘केजरीवालांवरच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांनी मला दु:ख झाले’
3 ‘बोको हराम’ने अपहरण केलेल्या ८२ मुलींची नायजेरियात सुटका
Just Now!
X