27 January 2021

News Flash

परशुराम वाघमारेनेच केली गौरी लंकेश यांची हत्या, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात शेवटचा सहावा संशयित परशुराम वाघमारेला अटक झाली असून त्यानेच गौरी लंकेश यांची हत्या केल्याचे एसआयटीच्या तपासातून समोर आले आहे.

गौरी लंकेश यांचं संग्रहित छायाचित्र

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात शेवटचा सहावा संशयित परशुराम वाघमारेला अटक झाली असून त्यानेच गौरी लंकेश यांची हत्या केल्याचे एसआयटीच्या तपासातून समोर आले आहे. गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि एमएम कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकच पिस्तुल वापरण्यात आल्याचा दावा एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.

वाघमारेने लंकेश यांच्यावर गोळया झाडल्या. फॉरेन्सिक चाचणीच्या अहवालातून गोविंद पानसरे, एमएम कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येसाठी एकच शस्त्र वापरल्याचे स्पष्ट झाले आहे असे एसआयटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.तिघांच्या हत्येसाठी जे शस्त्र वापरण्यात आले ते अद्याप सापडलेले नाही. बंदुक सापडली नाही तरी शरीरात घुसलेल्या गोळीवरुन कुठली बंदुक असेल त्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येते असे एसआयटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

गौरी लंकेश यांची हत्या करणाऱ्या संघटनेने कोणतेही नाव धारण केलेले नसून या संघटनेचे पाच राज्यात जाळे पसरले आहे. त्यांचे ६० सदस्य आहेत असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. या टोळीचे मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये जाळे पसरले आहे. आम्हाला आतापर्यंत उत्तर प्रदेशच्या कनेक्शन संबंधी धागेदोरे हाती लागलेले नाहीत असे अधिकाऱ्याने सांगितले.

हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था या सारख्या कट्टरपंथीय हिंदुत्ववादी संघटनांमधून लोक या नव्या संघटनेत आले असले तरी या हत्यांमध्ये हिंदू जनजागृती समिती किंवा सनातन या संस्थांचा थेट संबंध नाही. या दोन संघटनांनी तिन्ही व्यक्तींच्या हत्येशी संबंध असल्याचा आरोप यापूर्वीच नाकारला आहे.

सुजीत कुमार ऊर्फ प्रवीण नवीन संघटनेसाठी सदस्यांची भरती करायचा. त्याच्या चौकशीतून या सर्व गोष्टीचा उलगडा झाला. आणखी तीन जण गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय असून त्यांचा एसआयटीकडून शोध सुरु आहे. गौरी लंकेश यांची मागच्यावर्षी पाच सप्टेंबर रोजी बंगळुरुतील घराच्या प्रवेशद्वाराजवळ गोळया झाडून हत्या करण्यात आली होती.

कटाची अंमलबजावणी करण्याआधी काटेकोर नियोजन केले जायचे. लक्ष्य हेरल्यानंतर त्यावर पाळत ठेवली जायची. लक्ष्याच्या कमकुवत बाजू काय आहेत त्या लक्षात घेतल्या जायच्या. त्यानंतर सहा महिने ते वर्षभराच्या आत त्या व्यक्तीला संपवले जायचे असे एसआयटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

ही टोळी प्रोफेस के.एस.भगवान यांची हत्या करण्यासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचली होती. त्याचवेळी आम्ही त्यांना अटक केली असे अधिकाऱ्याने सांगितले. कर्नाटक पोलिसांनी भगवान यांच्या हत्येच्या कटाचा पदार्फाश केल्यानंतर अटक केलेल्या चौघांच्या चौकशीत ते गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटात सहभागी असावेत असा संशय आला. भगवान यांच्या लेखनामुळे उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या मनात त्यांच्याबद्दल एक राग होता. एसआयटीला अलीकडेच एका संशयिताकडे डायरी सापडली. त्यामध्ये संभाव्या टार्गेटसची नावे होती. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते गिरीश कर्नाड यांचेही नाव होते असे अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2018 7:27 pm

Web Title: waghmare killed gauri lankesh govind pansare and mm kalburgi
Next Stories
1 …त्यावेळी वाजपेयींनी पंडित नेहरुंच्या सन्मानासाठी घेतला ‘हा’ निर्णय
2 ‘देशात सैनिक, पत्रकार, विद्यार्थी मारले जात आहेत, पंतप्रधान दंड-बैठका काढण्यात रमलेत’
3 FB Live बुलेटीन: कोल्हापूरच्या मंदिरात सर्व जातीचे पुजारी नेमणार; RSS राष्ट्रवादी संघटना, CIAचं निरीक्षण आणि अन्य बातम्या
Just Now!
X