जम्मू-काश्मीरमधील कृष्णा खोऱ्यात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या मृतदेहांची विटंबनाही केली. त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. शहीद जवान प्रेम सागर यांच्या मुलीनेही तीव्र संताप व्यक्त केला आहे. माझ्या वडीलांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही. त्यांनी दिलेल्या बलिदानाच्या बदल्यात पाकिस्तानच्या ५० सैन्यांची मुंडकी आणा, अशी मागणी तिने केली आहे.

पाकिस्तानी सैन्याने सोमवारी कृष्णा खोऱ्यातील भारतीय लष्कराच्या दोन चौक्यांवर उखळी तोफा आणि रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले. पाकिस्तानी सैन्याने शहीद जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली. हल्ल्यात बीएसएफचे जवान प्रेम सागर हेही शहीद झाले. त्यांच्या मृतदेहाची पाकिस्तानी सैन्याकडून विटंबना करण्यात आली. देवरिया येथील रहिवासी असलेले प्रेम सागर यांच्या घरी शोकाकुल वातावरण आहे. त्यांच्या मुलीने पाकिस्तानी सैन्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात आपल्या वडिलांना वीरमरण आले आहे. याबाबत लष्कराच्या प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. माझ्या वडीलांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही. त्याबदल्यात पाकिस्तानच्या ५० सैन्यांची मुंडकी आणा, अशी मागणी प्रेम सागर यांच्या मुलीने केली आहे. कृष्णा खोऱ्यात पंजाबमधील नायब सुभेदार परमजित सिंग हेही शहीद झाले आहेत. त्यांच्या मृतदेहाचीही पाकिस्तानी सैन्याकडून विटंबना करण्यात आली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत असून, लष्करानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या नृशंसतेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला सूट देण्यात आली आहे, असे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, परमजित सिंग यांचे पूर्ण पार्थिव मिळाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी भूमिका त्यांच्या पत्नीने घेतली आहे.

दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने जानेवारीपासून आतापर्यंत ६५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सोमवारीही पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. अचानक झालेल्या हल्ल्यात परमजित सिंग आणि प्रेम सागर हे दोन जवान शहीद झाले. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या दोन चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.