आपल्या एका चुकीमुळे 18 वर्षांपासून फरार असणारा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपी उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. गावात आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्यात सहभागी होण्यासाठी तो आला आणि पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. पोलीस गेल्या 18 वर्षांपासून त्याचा शोध घेत होते. हा आरोपी पॅरोलवर असताना फरार झाला होता. ठाण्यातून तो फरार झाला होता. महाराष्ट्र आणि कोतवाली देहात पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

1994 मध्ये ठाण्यातील वर्तकनगर परिसरातून हत्या प्रकरणात अशोक कुमार याला अटक करण्यात आली होती. हत्या प्रकरणी त्याच्यावर खटला चालवण्यात आला होता. 1997 मध्ये न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण तीन वर्षांनी 2000 रोजी आरोपी अशोक कुमार 15 दिवसांच्या पॅरोलवर असताना फरार झाला.

पोलिसांना चकवा देत आरोपी अशोकने पळ काढला होता. 2013 मध्ये महाराष्ट्र पोलिसांना त्याला फरार घोषित केलं. आरोपी त्याच्या गावी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अटकेसाठी उत्तर प्रदेशात पोहोचली होती. सराय अचल गावात सुरु असलेल्या भंडारादरम्यान महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपी अशोक कुमारला अटक केली.