ख्यातनाम उद्योगपती वॉरेन बफेट पहिल्यांदाच भारतात गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. डिजिटल वॉलेट कंपनी ‘पेटीएम’ची पॅरेंट कंपनी ‘वन 97 कॉम्युनिकेशंस’मध्ये ते गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे बफेट यांच्या ‘बर्थशायर हॅथवे’ या कंपनीची गुंतवणूक असलेली पेटीएम ही भारतातील पहिली कंपनी ठरणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची ते गुंतवणूक करणार आहेत.

या गुंतवणुकीबाबत वॉरेन बफेट यांच्या बर्थशायर हॅथवे आणि पेटीएममध्ये बोलणी सुरू असून येत्या २ ते ३ आठवड्यांमध्ये याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. बर्थशायर हॅथवे वन-97 कम्युनिकेशनमधील सुमारे 3 ते 4 टक्के समभाग खरेदी करेल, असे म्हटले जात आहे. पेटीएममध्ये गुंतवणूक करण्याच्या वृत्ताला ‘बर्थशायर हॅथवे’ने दुजोरा दिला आहे, मात्र नेमकी किती गुंतवणूक आहे याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही.

या गुंतवणुकीमुळे पेटीएमला चांगलाच फायदा होण्याची शक्यता असून ई-मार्केटमध्ये आणि इतर डिजिटल वॉलेट कंपन्यांना टक्कर देण्यास त्यांना अधिक बळ मिळेल असं म्हटलं जात आहे. पेटीएममध्ये या आधीच चीनच्या अलीबाबा आणि जपानच्या सॉफ्टबँकच्या वन-97 कम्युनिकेशन या कंपनीची जवळजवळ 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.