कोका कोला या जगप्रसिद्ध शीतपेय कंपनीचा मालक पूर्वी शिकंजी विकायचा तर मॅकडोनल्ड्सच्या मालकाचा पूर्वी ढाबा होता, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. मात्र, या दाव्यामुळे राहुल गांधी यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली. ट्विटरवर #AccordingToRahulGandhi हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये असून राहुल गांधी यांनी कोका कोलाबाबत चुकीची माहिती दिल्याने ते सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल झाले.

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवरील ओबीसी परिषदेत सोमवारी राहुल गांधी यांनी संबोधित केले. भाजपचे दोन-तीन नेते आणि संघ पडद्याआडून सरकारचा कारभार चालवत आहेत. लोकसभेत, विधानसभेत विरोधी पक्षांचे ऐकले जात नाही, केवळ संघाचेच ऐकले जाते, संघ ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गांधी यांनी केला. मोदी सरकारच्या उद्योग धोरणावर टीका करताना राहुल गांधी यांनी थेट परदेशातील ख्यातनाम कंपन्यांचा दाखला दिला. पण उदाहरण देताना त्यांचे संदर्भ चुकले.

राहुल गांधी म्हणाले, तुम्हाला कोका-कोला या कंपनीविषयी माहिती आहे का?. मी तुम्हाला आज त्या कंपनीचा इतिहास सांगतो. त्या कंपनीचे संस्थापक पूर्वी शिंकजी विकायचे. ते पाण्यात साखर टाकायचे आणि सरबत तयार करुन विकायचे. यातूनच त्यांनी पैसे कमावले. त्यांच्यातील या कौशल्याचा योग्य तो सन्मान झाला आणि यातूनच कोका-कोला ही कंपनी उभी राहिली, असे त्यांनी सांगितले.

मॅकडोनल्ड्स या कंपनीच्या संस्थापकांचा पूर्वी ढाबा होता. यातूनच त्यांनी मॅकडोनाल्ड्ससारखी कंपनी सुरु केली. फोर्ड, मर्सिडीझ, होंडा या कंपन्यांचे मालकही पूर्वी मॅकेनिक होते. भारतात अशी कोणती ऑटोमोबाइल कंपनी आहे की जी एखाद्या मॅकेनिकने सुरु केली आहे?, भारतातील मॅकेनिकमध्ये क्षमता नाही, असं नाही. पण भारतातील बँकाचे दरवाजे अशा लोकांसाठी बंद असतात. आपल्याकडे क्षमता आहे, पण देशाकडून त्यांना मदत होत नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी भाजपा आणि काँग्रेसमधील फरक सांगताना पुढे बसचे उदाहरण दिले. आम्ही (काँग्रेस) लोकांना बसमध्ये बसायला सांगतो. बसची चावी लोकांकडे देतो आणि बस त्यांनाच चालवायला देतो. पण भाजपाचे उलट आहे.ते बसमध्ये लोकांना बसवतात. लोकांनी गप्प बसावं, यासाठी धमकी देतात आणि मग ती बस संघवाले चालवतात, असे राहुल गांधी यानी सांगितले.

राहुल गांधी यांच्या या विधानांनी सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवण्यात आली. तर भाजपा समर्थक राहुल गांधींना ट्रोल करण्यात व्यस्त असताना राहुल गांधी  नरेंद्र मोदींच्या अगोदर वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, असे सांगत काँग्रेस समर्थकांनी भाजपावर पलटवार केला.