देशभरातील काश्मिरी जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सीआरपीएफचे महानिरिक्षक झुल्फिकार हसन यांनी म्हटले आहे. पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर स्थानिक काश्मिरी दहशतवाद्याकडून झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात शिकणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर दलाकडून काश्मिरी जनतेला न घाबरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


नवी दिल्लीत आज लष्कर आणि सीआरपीएफने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत महानिरिक्षक हसन बोलत होते. देशातील विविध भागात शिकणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यींनी घाबरण्याचे कारण नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. गरज पडल्यास या विद्यार्थ्यांना मदतीसाठी 14411 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी सीआरपीएफकडून करण्यात आले.

अनेक काश्मिरी विद्यार्थ्यांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जे काश्मिरी मुलं काश्मिरबाहेर शिकत आहेत त्यांनी सुरक्षा रक्षकांकडून काळजी घेतली जाईल, असा विश्वासही त्यांनी दिला.


पुलवामात हल्ल्यापुर्वी रोड ओपनिंग पार्टीने (आरओपी) महामार्ग सुरक्षित केला होता. मात्र, खासगी कारमधून आयईडी स्फोटकं आणण्यात आल्याने हा हल्ला घडला. त्यानंतर आता नागरिकांच्या वाहनांवरील मानक कार्यपद्धतीतही बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.