करोना नावाच्या संकटाशी लढा देण्यासाठी भारताने जन आंदोलन उभं केलं. असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. UNESC च्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. करोनाचं संकट जेव्हा भारतात आलं तेव्हा संपूर्ण भारत या विरोधात लढा देण्यासाठी उभी राहिली आहे. त्यामुळेच जगाच्या तुलनेत भारतात करोनाचं प्रमाण नियंत्रणात आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा नवा मंत्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरुवात भारताने आता केली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या परिषदेत ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

भारतातील करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत निश्चित चांगले आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. भारताने जनतेला करोनाच्या लढाईशी जोडलं. प्रत्येकजण करोनाशी लढा देतो आहे. आपल्या देशावर आलेलं संकट परतवून लावायचं आहे हा निर्धार देशातल्या प्रत्येक नागरिकाने केला आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आम्ही आत्मनिर्भर भारत ही मोहीम सुरु केली आहे.आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील अन्न सुरक्षा योजनेचाही उल्लेख केला आहे.

संयुक्त राष्ट्राच्या ७५ व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला न्यूयॉर्कमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्चुअल सहभाग घेतला होता. यावेळी झालेल्या भाषणात त्यांनी भारताने नैसर्गिक संकटांशी केलेला सामना, करोनाविरोधातली लढाई, गरीबांसाठी राबवलेल्या योजना आणि आत्मनिर्भर भारत या मुद्यांवर भाषण केलं.