जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले आहेत. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोष या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणी आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या असून लवकरच गुन्हे दाखल केले जातील असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिले आहेत.

विद्यापीठातील हिंसाचारानंतर जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलिसांकडे वैद्यकीय सहाय्यतेची तसेच हा हिंसाचार घडवून आणणाऱ्या गुंडांना अटक करण्याची मागणी केली. त्याचबरोबर जामिया समन्वय समितीने (जेसीसी) देखील दिल्ली पोलिसांकडे विद्यापीठात धिंगाणा घालणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्या गुंडांची ओळख पटवून त्यांच्यावर तत्काळ एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात उमटू लागले आहेत. हल्ल्याच्या निषेधार्थ मध्यरात्री मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला. यामध्ये विद्यार्थी नेता उमर खलिदही सहभागी झाला होता. तसेच मुंबई आयआयटीमध्येही विद्यार्थींनी पर्दशन करत निशेध दर्शवला आहे. तर पुण्यातही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला.

जेएनयूतील हल्ल्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह किमान १८जण जखमी झाले आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) हात असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला  आहे. ‘अभाविप’ने मात्र त्याचा इन्कार केला आहे.