भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यात आम्ही महत्वाची भूमिका बजावली असा दावा संयुक्त अरब अमिरातीचे भारतातील राजदूत डॉ. अहमद अल बान्ना यांनी केला आहे. ज्यादिवशी सर्वाधिक तणाव निर्माण झाला होता त्यादिवशी आमच्या क्राऊन प्रिन्सनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बरोबर चर्चा केली. दोन्ही देशांनी मतभेदांवर शांततेने तोडगा काढावा अशी आमची भूमिका होती असे डॉ. अहमद अल बान्ना यांनी म्हटले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या तळावर भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर दुसऱ्यादिवशी पाकिस्तानी विमाने भारतीय हद्दीत घुसली. त्यांनी भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. त्यावेळी आकाशात झालेल्या डॉगफाइटमध्ये भारताचे पाकिस्तानचे एफ-१६ हे अत्याधुनिक विमान पाडले. पाकिस्ताननेही भारताचे मिग-२१ बायसन विमान पाडले.

भारताचे विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळल्यामुळे भारतीय वैमानिक अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या हाती लागले. या हवाई संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानने सर्व प्रवासी विमानांची उड्डाणे थांबवली होती.

भारताने आपल्या कारवाईत दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते पण पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा तणाव निर्माण झाला होता. भारताने कुठलीही कारवाई करु नये यासाठी पडद्यामागून अमेरिका, चीन आणि सौदी अरेबिया हे देश प्रयत्न करत होते.