पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातले सगळे लाईट बंद करण्याचं आवाहन केलं आहे. ९ मिनिटांसाठी घरातले सगळे लाईट बंद करा आणि घराच्या गॅलरीत किंवा दारात ९ मिनिटांसाठी एक दिवा, मेणबत्ती किंवा मोबाइल टॉर्च लावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यांच्या या आवाहनावर प्रचंड टीका होताना दिसते आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही यावरुन त्यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरुन आम्ही दिवे पेटवू पण त्यांनीही जरा अर्थतज्ज्ञांचं ऐकावं असा खोचक टोला चिदंबरम यांनी मारला आहे.

काय म्हणाले आहेत पी चिदंबरम ?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आवाहन आम्ही ऐकू. ५ एप्रिल रोजी आम्ही दिवे पेटवू पण माझं तुम्हाला हे सांगणं आहे की जरा अर्थतज्ज्ञ काय सांगत आहेत तेदेखील तुम्ही ऐका. आम्हाला वाटलं होतं की तुम्ही गरीबांसाठी पॅकेज जाही कराल मात्र तुम्ही तर दिवे लावण्यास सांगितले. देशातल्या गरीबांना आजही पॅकेजची गरज आहे”

असं म्हणत पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर टीका केली. सध्या काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मग तो व्यावसायिक असो किंवा रोजंदारीवर काम करणारा मजूर प्रत्येकाला मदतीची गरज आहे. या सगळ्या घटकांना आर्थिक मदत देणं गरजेचं आहे. जसे कठोर निर्णय आवश्यक आहेत तसेच मदतीसाठीच्या पॅकेजचीही गरज आहे असंही पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- मोदींचं आवाहन: रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाइट बंद ठेऊन, मेणबत्ती, फ्लॅशलाइट लावा

सिब्बल यांचीही टीका

फक्त पी चिदंबरमच नाही तर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर टीका केली आहे. काही मुद्दे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये उपस्थित केले आहेत. त्या अनुषंगाने कपिल सिब्बल यांनीही टीका केली आहे. कामगारांना आर्थिक मदत, करोना व्हायरस रोखण्यासाठीची पावलं, करोनाची टेस्टिंग किट् या सगळ्याचा उल्लेख आजच्या भाषणात यायला हवा होता. त्याऐवजी तुम्ही दिवा लावण्यास सांगितलं आहे तो दिवा पेटवण्यामागे काहीतरी हेतू असला पाहिजे अंधश्रद्धा नाही असंही सिब्बल यांनी सुनावलं आहे.