लग्नात फोटो काढून घेण्याची हौस सर्वांनाच असते. लग्नात फोटोग्राफरने आपले जास्तीत जास्त फोटो काढावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी अनेकदा त्याला विनंती करत वेगवेगळ्या पोज देताना महिलावर्ग दिसत असतो. तुम्हालाही अशी सवय असेल तर सावधानता बाळगण्याची गरज आहे, कारण केरळमध्ये एका प्रसिद्ध स्टुडिओने लग्नातील महिलांच्या फोटोंचा गैरवापर करत पॉर्नसाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केरळमधील कोझिकोड येथे हा स्टुडिओ असून लग्न आणि इतर कौटुंबिक कार्यक्रमांच्या फोटोंसाठी तो प्रसिद्ध आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तपासासाठी विशेष पथक गठीत केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.

अनेक महिलांना आपले लग्नातील फोटो मॉर्फ करुन वापरण्यात आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं लक्षात आलं. महिलांनी तक्रार केल्यानंतर सद्यम शूट अँड एडिट स्टुडिओविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी घटनेसंबंधी विधानसभेत माहिती देताना स्टुडिओ सील केला असून, मालक दिनेशन आणि सथीशन यांच्यासहित सहमालकांना अटक करण्यात आल्याचं सांगितलं आहे. या गुन्ह्यात बिबीश या व्यक्तीचाही समावेश असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर ज्या लोकांनी या स्टुडिओच्या फोटोग्राफरला फोटो काढण्याची ऑर्डर दिली होती ते प्रचंड घाबरले होते. आपल्या फोटोंचाही गैरवापर करण्यात आला असावा अशी भीती त्यांना सतावत होती.

विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरलं होतं. हा अत्यंत गंभीर गुन्हा असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी लोकांची अपेक्षा असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. केरळ महिला आयोगानेही घटनेची दखल घेतली असून पोलीस अधिक्षकांना त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथक गठीत करण्यास सांगितलं आहे.