पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचे स्वागत करत तुमच्या शौर्याचा आम्हाला गर्व आहे असं म्हटलं आहे. तुम्ही जे धैर्य आणि शौर्य दाखवलेत त्याचा मलाच माझ्यासह १३० कोटी भारतीयांना अभिमान आहे. आपले लष्कर, वायुदल आणि नौदल याबाबत देशाला गौरव आहे. असे गौरवोद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचे स्वागत केले आहे. अभिनंदन यांच्यासंबंधीचा हा ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

आपल्याला ठाऊक आहेच की अभिनंदन वर्थमान हे तब्बल साठ तासांनी अटारी वाघा सीमेवरून पाकिस्तानातून मायदेशी परतले. पाकिस्तानी रेंजर्स आणि सीमा सुरक्षा दल यांच्यातली कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यानंतर अभिनंदन यांनी भारतीय सीमेत प्रवेश केला. अभिनंदन आता विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. बुधवारी भारतीय हवाई हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान अपघातग्रस्त झाले. ज्यानंतर पॅराशूटच्या मदतीने अभिनंदन यांनी उडी घेतली मात्र ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहचले जिथे त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. त्यानंतर कोणतीही चर्चा न करता अभिनंदन यांची सुटका करा अशी मागणी भारताने केली होती. जी मान्य करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा गुरुवारी केली. त्यानंतर आज अभिनंदन मायदेशी परतले. त्यांनी दाखवलेल्या शौर्याचे कौतुक देश करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर दिली आहे.