अमेरिकेत सत्तांतर होऊन जो बायडेन यांच्या हाती धुरा आली आहे. बायडेन यांच्या कार्यकाळातही भारत-अमेरिका संबंध आणखी दृढ होतील, नवी उंची गाठतील असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. इंडो-पॅसफिक क्षेत्रात भारत आमचा महत्त्वाचा सहकारी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

“इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत आमचा महत्त्वाचा सहकारी आहे. आघाडीची जागतिक शक्ती म्हणून भारताच्या उदयाचे आम्ही स्वागत करतो. या प्रदेशात भारताची भूमिका सुरक्षा प्रदान करणाऱ्या देशाची राहीलं” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस पत्रकार परिषदेत म्हणाले.

पंधरवडा पूर्ण होण्याआधीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री टोनी ब्लिंकन आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यात दुसऱ्यांदा चर्चा झाल्याचे नेड प्राइस यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका मैत्री संबंध अधिक बळकट करण्याचा संकल्प बोलून दाखवला तसेच दोघांमध्ये परस्परांच्या हिताच्या आणि चिंतेच्या विषयावर चर्चा झाली. यामध्ये म्यानमारचा विषय सुद्धा होता.

म्यानमारमध्ये झालेला लष्करी उठावाबद्दल टोनी ब्लिंकन यांनी चिंता व्यक्त केली. “दोन्ही बाजूंचा क्वाड आणि अन्य माध्यमातून प्रादेशिक सहकार्याचा विस्तार करण्यावर भर राहीलं तसेच कोविडमुळे निर्माण झालेली आव्हाने आणि वातावरण बदलाबद्दल चर्चा झाली” असे नेड प्राइस यांनी सांगतिले.

“आमचे सरकार सर्वोच्च पातळीवर वेगवेगळया आघाड्यांवर सहकार्य, मैत्री संबंध विकसित करण्याचा प्रयत्न करेल. भारत-अमेरिकेची भागीदारी, मैत्री अधिक भक्कम, दृढ होईल याचा आम्हाला विश्वास आहे” असे प्राइस पत्रकारांना म्हणाले.

शपथ घेतल्यानंतर जो बायडेन आणि पंतप्रधान मोदींमध्ये पहिल्यांदा फोनवरुन चर्चा

अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सोमवारी फोनवरुन चर्चा झाली. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये प्रादेशिक मुद्दे, वातावरण बदल आणि रणनितीक भागिदारी या विषयांवर सविस्तर बोलणे झाले. ‘मी आणि जो बायडेन नियम आधारीत आंतरराष्ट्रीय करारांचे पालन करण्यास कटिबद्ध आहोत’ असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

“बायडेन यांना यशस्वी होण्यासाठी मी शुभेच्छा दिल्या. प्रादेशिक मुद्दे आणि दोन्ही देशांच्या दृष्टीने प्राधान्य असलेल्या विषयावर आम्ही चर्चा केली. पर्यावरण बदलाविरोधात दोन्ही देश परस्परांना सहकार्य करतील” असे मोदींनी टि्वट करुन सांगितले.