पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक

 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या २९१ उमेदवारांची यादी जाहीर केली. या वेळी युवक, अल्पसंख्याक, महिला आणि मागासवर्ग समाजातील उमेदवारांना तिकिटे देण्यात आली आहेत. स्वत: ममता बॅनर्जी नंदिग्राम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.

तृणमूल काँग्रेसचा घटक पक्ष असलेल्या गुरखा जनमुक्ती मोर्चाच्या (जीजेएम) बिमल गुरुंग गटासाठी दार्जिलिंगमधील तीन जागा सोडण्यात आल्या आहेत. या वेळी आम्ही युवक आणि महिला उमेदवारांना अधिक उमेदवारी दिली आहे. जवळपास २३-२४ विद्यमान आमदारांना वगळण्यात आले आहे. उमेदवारांच्या यादीत ५० महिला, ४२ मुस्लीम, ७९ अनुसूचित जाती आणि १७ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना तिकिटे दिली आहेत, असे बॅनर्जी म्हणाल्या.

आपण सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला असून तृणमूल काँग्रेससाठी आतापर्यंतची ही सर्वात सोपी निवडणूक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाल्या. सत्तेवर आल्यानंतर आम्ही ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना सामावून घेण्यासाठी विधान परिषदेची निर्मिती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यांचे वय ८० वर्षांहून अधिक आहे त्या प्रत्येकाला आम्ही सामावून घेऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना हवी तेवढी केंद्रीय दले तैनात करावी, विजय तृणमूल काँग्रेसचाच होणार, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.