‘माझा दोष इतकाच की मी मुस्लीम असूनही हिंदूबहुल वस्तीत प्रवेश केला….’ ६७ वर्षीय अबूल बशर पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांची व्यथा मांडत होते. अबूल व त्यांची पत्नी बेदनाबीबी (६१) दोघेही अंध असून भीक मागून ते पोटाची खळगी भरतात. मात्र, रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराने या दाम्पत्याला मानसिक धक्काच बसला असून या अंध दाम्पत्याला हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जय श्री राम आणि जय माँ तारा असा जयघोष करण्यास भाग पाडले.

पश्चिम बंगालमधील आसनसोल आणि राणीगंज येथे रामनवमीच्या यात्रेवरुन दंगल झाली होती. या हिंसाचाराचा फटका बशर दाम्पत्याला बसला. बशर दाम्पत्य गेल्या आठवड्यात मंगळवारी अंदाल येथे होते. बशर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला हिंसाचाराच्या कटू आठवणी सांगितल्या. ‘अंदालमध्ये काही तरुणांनी आम्हाला गाठले. त्यांनी माझी टोपी खेचली. तुम्ही मुस्लीम असूनही हिंदूबहुल वस्तीत प्रवेश केला, असे सांगत त्या तरुणांनी आम्हाला बेदम मारहाण केली. माझ्या पत्नीने विनवणी केली. पुन्हा या भागात येणार नाही, असेही सांगितले. मात्र, यानंतरही त्या तरुणांनी मारहाण सुरुच ठेवली’, असे बशर यांनी सांगितले.

‘मी आंधळा असून फक्त भीक मागण्यासाठी आलो. मी कोणालाही त्रास देत नाही. मला जाऊ द्या’, असे बशर यांनी त्या तरुणांना सांगितले. मात्र, ते तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्या तरुणांनी आम्हाला ‘जय श्रीराम, जय माँ तारा’ असे बोलण्यास भाग पाडले. जर ‘जय श्रीराम’ असा जयघोष केला नाही तर ठार मारु अशी धमकी त्या तरुणांनी बशर दाम्पत्याला दिली होती. त्या टोळक्याने बशर यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन व्हायरल केला आहे.

विशेष म्हणजे अंदालमधील पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय चक्रवर्ती यांनी अशा कोणत्याही घटनेची माहिती नसल्याचे सांगितले. आमच्याकडे अजून तक्रार आलेली नाही, असे त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. ‘आम्ही त्या प्रकाराने इतके घाबरलो की आम्हाला पोलिसांकडे जाण्याची देखील हिंमत झाली नाही, असे बशर दाम्पत्याने नमूद केले. अंध दाम्पत्याला हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी असा त्रास दिल्याने संताप व्यक्त होत आहे.