कमलनाथांनी उत्तर भारतीयांबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. महाराष्ट्रातून बऱ्याचदा असा सूर निघतो की उत्तर भारतीय इकडे कशाला येतात? ते इकडे येऊन कामं कशाला करतात? असंच दिल्लीतूनही ऐकायला मिळत आहे. त्यानंतर आता मध्य प्रदेशातून तोच सूर निघतो आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की, उत्तर भारतीयांनी ठरवलं तरच केंद्रात तुमच सरकार येईल, अशा शब्दांत त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना सुनावले.


मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी कमलनाथ म्हणाले होते की, राज्यात जे उद्योग असतील त्यात ७० टक्के स्थानिक लोकांनाच संधी दिली जाईल. युपी, बिहारमधून राज्यात लोक येतात त्यामुळे इथल्या लोकांना काम मिळत नाहीत. मात्र, त्यानंतर ते म्हणाले की, मी त्यांच्यावर टीका करीत नाही मात्र त्यामुळे आमचे मध्य प्रदेशातील तरुण रोजगारांपासून वंचित राहतात.

कमलनाथ यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून टीका होत आहे. त्यात आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेल्या अखिलेश यादव यांनीही टीका केली आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशात काँग्रेसला सरकार स्थापण्यात अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाने आणि मायावतींच्या बहुमजन समाज पक्षाने पाठींबा दिला आहे. त्यामुळेच काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठत सत्ता स्थापनेचा दावा करता आला.