पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात संरक्षण दलांसदर्भात महत्वपूर्ण घोषणा केली. लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची निर्मिती केली जाणार आहे. संरक्षण तज्ञांनी आतापर्यंत अनेकवेळा सीडीएस नियुक्तीची मागणी केली होती. १९९९ साली पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगिल युद्धानंतर सर्व प्रथम ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची शिफारस करण्यात आली होती.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख असेल. सीडीएस फोर स्टार अधिकारी असेल. लष्कर, हवाई दल किंवा नौदलातून सीडीएस निवडला जाईल. सीडीएस पंतप्रधान आणि सैन्य दलांमध्ये दुवा साधण्याचे काम करेल. तिन्ही सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या उद्देशाने या पदाची निर्मिती करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. सैन्य दले आपल्या देशाचा अभिमान आहेत. तिन्ही सैन्य दलांमध्ये अधिक अचूक समन्वय रहावा यासाठी लाल किल्ल्यावरुन मी महत्वाची घोषणा करत आहे असे मोदी म्हणाले. भारताचाही ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ असेल. त्यामुळे सैन्यदले अधिक प्रभावी होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

सीडीएस या पदाबद्दल सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास या पदावर नेमलेला माणूस भारत सरकारचा सल्लागार असेल. सीडीएस लष्कर, नौदल आणि हवाई दलासंदर्भातील वेगवेगळया विषयांवर सरकारला सल्ला देईल. निवृत्त जनरल व्ही.पी.मलिक यांनी पंतप्रधान मोदींच्या घोषणेचे स्वागत केले आहे. व्ही.पी.मलिक कारगिल युद्धाच्यावेळी लष्करप्रमुख होते.

सीडीएस पदाच्या निर्मिती करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी तुमचे आभार. या निर्णयामुळे आपली राष्ट्रीय सुरक्षा अधिक बळकट होईल असे मलिक यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. १९९९ सालच्या कारगिल युद्धानंतर सर्वप्रथम या पदाची शिफारस करण्यात आली होती. कारगिल युद्धानंतर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी शोधण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने तिन्ही सैन्य दलासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची शिफारस केली होती.