News Flash

काय आहे जलीकट्टू? जाणून घ्या या परंपरेविषयी..

गेल्या २० वर्षांमध्ये २०० पेक्षा अधिक लोक या खेळात बळी पडले आहेत.

पोंगल सणादरम्यान खेळण्यात येणारा जलीकट्टू हा तामिळनाडूचा पारंपारिक खेळ आहे. या खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. जलीकट्टू या खेळाचा अर्थ आहे वळूंना वश करणे. या खेळाला २००० वर्षांची परंपरा आहे. जाणून घेऊया या पारंपारिक खेळाविषयी.

तज्ज्ञांच्या मते जलीकटटू हे नाव या खेळाला त्याच्या वैशिष्ट्यामुळे पडले आहे. सल्ली कासू म्हणजे नाणी आणि कट्टू म्हणजे या नाण्यांचा संग्रह. एक पिशवी वळूच्या शिंगांना बांधली जाते. जेव्हा हे वळू पळतात तेव्हा त्यांच्या मागे युवक धावतात आणि त्यांच्या शिंगांना बांधलेली पिशवी काढून घेण्याचा प्रयत्न करतात. या खेळामध्ये जेलीकट या विशिष्ट जातीच्या वळूंचा वापर केला जातो म्हणून देखील या खेळाला जलीकट्टू हे नाव पडले आहे. शिंगांना पैसे बांधण्याव्यतिरिक्त खेळाडूंना मोठे बक्षीस देखील दिले जाते.

कसा खेळला जातो हा खेळ?

जेव्हा या खेळाला सुरुवात होते तेव्हा वळूंच्या शिंगांना पैसे बांधून त्यांना भडकवले जाते. त्यांना पळण्यास प्रवृत्त केले जाते. बऱ्याचदा गर्दीमुळे हे वळू गांगरुन जातात आणि ट्रॅकवर पळण्याऐवजी ते गर्दीमध्ये घुसू पाहतात. काही वेळा या वळूंना मद्य देखील दिले जाते. त्यांनी जोरात पळावे म्हणून त्यांची शेपटी पिरगाळली जाते.

का आहे हा खेळ वादग्रस्त?

जलीकट्टू हा खेळ देशातील सर्वात धोकादायक खेळांपैकी एक मानला जातो. या खेळामुळे आतापर्यंत कित्येक लोक मृत्यूमुखी पडले आहे तर अनेकांना अपंगत्वदेखील आले आहे. २०१० ते २०१४ दरम्यान या खेळामुळे १,१०० लोक गंभीरिरत्या जखमी झाले तर १७ जणांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या २० वर्षांमध्ये २०० पेक्षा अधिक लोक बळी पडले आहेत. या खेळात ज्या बैलांचा वापर होतो त्यांच्यावर अत्याचार केले जातात अशी याचिका पेटाने टाकली होती. कित्येक वर्षे पेटाने याविरोधात आंदोलन केले आहे. २०१४ मध्ये या खेळामध्ये बैलांचा वापर थांबविण्यात यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

किती वर्षे जुनी आहे परंपरा?

या खेळाची परंपरा किमान  २००० वर्षे जुनी आहे असे म्हटले जाते. प्राचीन काळी स्वयंवरासाठी देखील या खेळाचे आयोजन होत असे. या खेळात भाग घेणारा जो कुणी युवक बैलावर नियंत्रण मिळवेल त्याच्या गळ्यात माळ टाकली जात असे. मदुराई, तिरुचिरापल्ली, थेनी, पुदुक्कोटाई आणि दिंडीगुल या तामिळनाडूमधील जिल्ह्यांमध्ये हा खेळ प्रामुख्याने खेळला जात असे. न्यायालयाने बंदी घालण्यापूर्वी मदुराईमध्ये मोठ्या प्रमाणावर हा खेळ खेळला जात असे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 8:58 pm

Web Title: what is jallikattu when did this start what is the controversy around jallikattu
Next Stories
1 काबूलमध्ये दहशतवादी हल्ला; बॉम्बस्फोटांमध्ये २७ ठार, ७० जखमी
2 BSf Jawan Tej Bahadur : बीएसएफ जवानाला दिले प्लंबरचे काम!
3 या कंपनीने दिली बराक ओबामांना नोकरीची ‘ऑफर’
Just Now!
X