पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये सरकार स्थापन करणाऱ्या काँग्रेसने आता लोकसभा निवडणुकीची रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. सध्या दिल्लीच्या राजकारणात खळबळ सुरु आहे. त्यामुळे इथेही भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस नवा डाव खेळण्याच्या तयारीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या युतीची चर्चा सुरु आहे. यावर स्थानिक नेते विविध विधानंही करीत आहेत.


दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनीही आपसोबत युतीबाबत आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये युती होईल की नाही याचा निर्णय पूर्णपणे हायकमांड म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधी आणि अन्य पदाधिकारी घेतील. त्यांचा निर्णय आम्हाला मंजूर असेल.
गेल्या अनेक काळापासून काँग्रेस आणि आपच्या युतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेष करुन लोकसभा निवडणुकीसाठी ज्या प्रकारे महायुती तयार होत आहे, त्यात आपचे प्रमुख अरविंद केजरीवालही उपस्थिती लावत आहेत. त्यानंतर या चर्चेने आणखीनच वेग घेतला आहे.

दुसरीकडे डीएमकेचे नेते स्टालिन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची सोमवारी दुपारी भेट घेतली होती. यावेळी स्टालिन यांनी केजरीवालांना सांगितले की, आपण आपल्या मनात काँग्रेसप्रती कोणतीही नकारात्मक भावना ठेवू नये. देशाला महायुतीची गरज असून यासाठी आपली गरज आहे. तत्पूर्वी रविवारी स्टालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही भेटले होते. त्यामुळे असं म्हटलं जातयं की स्टालिन काँग्रेस आणि आपमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.