व्हॉट्सअॅपवरील अफवा पसरवणाऱे आणि खोटे संदेश रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपने मोठे पाऊल उचलले असून भारतासाठी कंपनीने तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या फेक मेसेजसंदर्भात युजर्सना या अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात गेल्या काही काळात अनेक अफवा पसरवणाऱ्या खोट्या मेसेजेसमुळे जमावाकडून मारहाणीच्या अनेक घटना घडल्या होत्या, यामध्ये मारहाण झालेल्या व्यक्तींचा बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाला होता. या घटनानंतर भारताने व्हॉट्सअॅपला असे अफवांचे मेसेज रोखण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यानंतर व्हॉट्सअॅपने हे पाऊल उचलले आहे. फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या व्हॉट्सअॅपने आपली वेबसाईटही अपेडट केली आहे. यामध्ये या तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता युजर्सना व्हॉट्सअॅप वापरताना काही मदत लागली तर त्यांनी मोबाईल अॅपवरून, मेलद्वारे किंवा पत्र लिहून मदत मागता येणार आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकेत बसून हा तक्रार निवारण अधिकारी भरतातील तक्रारींचे काम पाहणार आहे. युजर्सच्या आलेल्या तक्रारींवर तो पुढील कार्यवाही करणार आहे. एकाच वेळी तो दोन्ही देशांमधील कामकाज पाहणार आहे. पुढील वर्षी भारतात निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून खोटे मेसेज व्हायरल होऊ नयेत यासाठी सरकारने फेसबूक, व्हॉट्सअॅप, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियांबाबत कडक पावले उचलली आहेत.

दरम्यान, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि व्हॉट्सअॅपचे प्रमुख क्रिस डॅनिअल्स यांची एका महिन्यापूर्वी भेट झाली होती. त्यावेळी या प्लॅटफॉर्मवर एखाद्या मेसेजचे मुळ ठिकाण शोधण्यासाठी यंत्रणा तयार करण्याची मागणी प्रसाद यांनी डॅनिअल्स यांच्याकडे केली होती. त्याचबरोबर व्हॉट्सअॅपवरील मेसेजमुळे कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्यास त्यावर तोडग्यासाठी व्हॉट्सअॅपने भारतीय कायद्यांच्या आधिन राहून काम करावे असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp appoints grievance officer for india
First published on: 23-09-2018 at 16:14 IST