यापुढे व्हॉट्स अॅप युजर्सना पाचपेक्षा जास्त वेळा एखादा मेसेज फॉरवर्ड करता येणार नाही. काही दिवसांपूर्वी व्हॉट्स अॅपनं ‘फॉरवर्ड मेसेज’ हे फीचर आणलं होतं. या फीचरमुळे ‘मुळ मेसेज’ आणि ‘फॉरवर्ड मेसेज’ यामधील फरक ओळखणं सहज शक्य झालं. गेल्या काही महिन्यंपासून व्हॉट्स अॅपवर अफवा पसरवणाऱ्या मेसेजेसचं पेव फुटलं त्यामुळे असा प्रकराच्या अफवा व्हॉट्स अॅपवर वाऱ्याच्या वेगानं पसरू नये आणि त्यातून अप्रिय घटना घडू नयेत म्हणून मेसेज फॉरवर्ड करण्याची मर्यादा कमी करण्याचा विचार व्हॉट्स अॅप करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंत एखादा व्हिडिओ, फोटो किंवा संदेश मोठ्या प्रमाणात व्हॉट्स अॅपवर फॉरवर्ड करता यायचे. याचा फायदा होता तसाच तोटाही होता. आता मात्र व्हॉट्स अॅपवर तुफान वेगानं फॉरवर्ड होणाऱ्या याच मेसेजमुळे कित्येक अप्रिय घटना घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे व्हॉट्स अॅपचा गैरवापर रोखण्यासाठी व्हॉट्स अॅपनं हा निर्णय घेतला आहे.  व्हॉट्स अॅप ‘फॉरवर्ड मेसेज’या फीचरची नव्यानं चाचणी करत आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यावर युजर्स व्हॉट्स अॅपवर आलेले मेसेज, व्हिडिओ आणि फोटो पाचपेक्षा जास्त व्यक्तींना फॉरवर्ड करू शकत नाही. पाच व्यक्तींना मेसेज फॉरवर्ड केल्यानंतर फॉरवर्ड करण्याची मर्यादा संपेल आणि चॅटवरून forward button हा पर्याय नाहीसा होईल.

व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. येथे मेसेज फॉरवर्ड होण्याचं आणि त्याद्वारे अफवा पसरवण्याचं प्रमाणही जास्त आहे हे व्हॉट्स अॅपनं आधीच स्पष्ट केलं. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्याचा काम व्हॉट्स अॅप करत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारनं व्हॉट्स अॅपला दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे. चिथावणीखोर मेसेजेसना थांबवण्यासाठी प्रभावी पावलं उचलावी अन्यथा ज्या माध्यामातून अफवा पसरवल्या जात आहेत त्यांनाही दोषी मानलं जाईल आणि त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल असं या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp is testing a new feature to limit the spread of spam and misinformation on the platform
First published on: 20-07-2018 at 10:14 IST