पठाणकोट हल्ल्यावरून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. देशात जेव्हा भाजपची सत्ता येते तेव्हा दहशतवादी हल्ले वाढतात, असा आरोप शिंदे यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काय बोलणे झाले? याची माहिती देशाला मिळायला हवी, अशी मागणी देखील शिंदे यांनी यावेळी केली.
पठाणकोट कारवाईतील उणिवांची संरक्षण मंत्र्यांची कबुली
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाकिस्तान दौऱयानंतर कारगिल घडले आणि आता मोदी यांच्या लाहोर दौऱयानंतर पठाणकोटच्या हल्ल्याला आपल्याला सामोरे जावे लागले. या हल्ल्यांना भाजपचे धोरणच जबाबदार आहे. देशात भाजपची सत्ता आली की दहशतवादी हल्ले वाढतात. त्यामुळे सरकारने जबाबदारी स्विकारून देशाची माफी मागायला हवी, असे सुशीलकुमार म्हणाले. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी मोदी सरकारने ठोस पावले उचलायला हवीत, असा सल्ला देखील शिंदे यांनी दिला.
दरम्यान, शिंदे यांचे आरोप फेटाळून लावताना मुंबईवरील २६/११ हल्ल्यावेळी देशात आणि राज्यात कुणाचे सरकार होते? असा सवाल भाजप नेते श्रीकांत शर्मा यांनी उपस्थित केला. तसेच देश एका हल्ल्याला सामोरे जात असताना अशावेळी सर्वांनी एकजूटीने राहायला हवे, असे सांगत काँग्रेसच्या वक्तव्याचा निषेध करत असल्याचेही शर्मा म्हणाले.
पठाणकोट हल्ल्यातील संबंधितांवर कारवाई करा ; अमेरिकेने पाकिस्तानला बजावले