उद्योगात ‘भारतीयत्वा’चा वसा आणि जगाला ‘अमृत’ चवीचा वारसा..

बेंगळुरू : ‘मेक इन इंडिया’चे वारे वाहण्याआधीच प्रतिकूलतेची आणि आव्हानांची पर्वा न करता ‘अमृत सिंगल माल्ट व्हिस्की’ या देशी बनावटीच्या विदेशी दर्जाच्या मद्याचे उत्पादन करणारे आणि या ‘अमृत’चवीची जगाला सवय लावणारे उद्योजक नीलकांत राव जगदाळे यांचे गुरुवारी बेंगळुरूतील रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

भारतीय उद्योजकांनी विविध ग्राहकोपयोगी क्षेत्रांत देशी उत्पादने तयार केली पाहिजेतच, पण त्या उत्पादनांची नावेही भारतीयत्व जपणारीच असली पाहिजेत, असे त्यांनी गेल्या वर्षीच एका कार्यक्रमात सांगितले होते. त्यांचा हा निर्धार या उद्योगात पाऊल टाकल्यापासूनचा आहे.

जगदाळे यांचे वडील राधाकृष्ण राव यांनी १९४८ मध्ये या मद्यउद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे अकाली निधन झाले तेव्हा हा उद्योग केवळ रम आणि ब्रॅण्डीचेच उत्पादन करीत होता. त्यांची विक्रीही देशातच सुरू होती. नीलकांत यांनी या उद्योगाचा पाया विस्तारला आणि ‘सिंगल माल्ट व्हिस्की’चे त्या काळातील एकाही देशी मद्य उद्योजकाने न पाहिलेले स्वप्न त्यांनी उराशी बाळगले.

भारतात तेव्हा व्हिस्कीचे उत्पादन होत असे, पण युरोपात त्याला व्हिस्कीचा दर्जा नव्हता. त्यामुळे ‘सिंगल माल्ट’ची कल्पना त्यांच्या मनात रुजली. २००४मध्ये ‘अमृत’ ब्रॅण्डची व्हिस्की बाजारात आली, पण पहिली तीन वर्षे प्रतिसाद अल्प होता. पण २००९मध्ये माल्ट मॅनिअ‍ॅक्स या जगविख्यात रूचीतज्ज्ञ संस्थेने ‘अमृत  फ्युजन’ या व्हिस्कीला सर्वोत्तम नैसर्गिक कास्क व्हिस्की म्हणून घोषित केले आणि जगाचे लक्ष या व्हिस्कीकडे वळले. २०१०मध्ये व्हिस्कीच्या दर्जातील सर्वोत्तम जाणकार मानले जाणारे पत्रकार जिम मरे यांनी जगातली सर्वोत्तम व्हिस्कीत ‘अमृत फ्युजन’ला तिसरा क्रमांक दिला तेव्हा खरी जगप्रसिद्धी अमृतला लाभली. त्यानंतर कंपनीची मोठी भरभराट झाली. आजही २२ देशांत या व्हिस्कीला वाढती मागणी आहे आणि त्या तुलनेत पुरवठा करणे कठीण होत आहे, अशी उत्साहवर्धक स्थिती आहे.

जलतरणपटुंना आधार

नीलकांत राव जगदाळे यांचा सामाजिक कार्यात, विशेषत: जलतरण क्षेत्रातही मोठा वाटा होता. तरुण पिढीला जलतरणासाठी ते प्रोत्साहन देत. त्यासाठी त्यांनी ‘बसवन्नागुडी अ‍ॅक्वेटिक सेंटर’ स्थापले होते. निशा मिल्लत आणि रेहान पोंचा यासारखे विख्यात जलतरणपटु याच केंद्रातून घडले.

बापूंकडून मूक प्रेरणा!

या व्हिस्कीचा जम बसत नव्हता तेव्हाची गोष्ट. परदेशांत या व्हिस्कीला अल्प प्रतिसाद होता. तेथील कार्यालयांचे भाडेही परवडणे कठीण झाले होते, कंपनीच्या नफ्यातील मोठा हिस्सा या व्हिस्कीसाठी खर्चावा लागत होता. त्या निराशेच्या काळात नीलकांत हे लंडनमध्ये होते. पुत्र रक्षित याच्यासह ते टाविस्टॉक चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी आले. तिथे शांतपणे बसून असताना त्यांना वाटू लागले की, समजा महात्माजींनीही हिंमत हरून माघार घेतली असती, तर देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातील त्यांच्या प्रेरणेपासून देश वंचितच झाला असता. त्यामुळे जे मनात आहे ते तडीस न्यायचेच. तिथून खरी प्रेरणा मिळाली आणि मग या व्हिस्कीला आश्चर्यकारक प्रतिसाद मिळू लागला, असे नीलकांत यांनीच एका मुलाखतीत सांगितले आहे.