दहशतवादाशीच नव्हे, तर विस्तारवादाविरोधातही भारत समर्थपणे लढत असून सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांना लडाखमध्ये जवानांनी कसा धडा शिकवला, हे अवघ्या जगाने पाहिले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला सुनावले.

७४व्या स्वातंत्र्यदिनी शनिवारी लाल किल्ल्यावरून सलग सातव्यांदा दिलेल्या दीड तासांच्या भाषणात मोदी यांनी चीन वा पाकिस्तानचा उल्लेख टाळला, परंतु १५ आणि १६ जूनला गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांचा हल्ला परतवून लावणाऱ्या जवानांचे कौतुक केले. भारताची पश्चिम नियंत्रण रेषा पाकिस्तानला भिडली असून पूर्वेला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा चीनशी संलग्न आहे. या दोन्ही सीमांवर शेजारी राष्ट्रांकडून होणाऱ्या आक्रमकलष्करी कारवायांचा बीमोड केला जाईल, असा निर्धार व्यक्त करीत मोदी यांनी चीनच्या विस्तारवादी भूमिकेवर परखड टीका केली.

लडाखमध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहताना मोदी म्हणाले की, आज भारताला जगाचा पाठिंबा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील सदस्यत्वासाठी १९२ पैकी १८४ देशांनी भारताच्या बाजूने कौल दिला. भौगोलिक सीमा भिडलेले देशच शेजारी असतात असे नव्हे, समान तत्त्वे आणि भावना असलेले देशही (अन्य आशियाई देश) सहकारी असतात. मोठय़ा परिघातील शेजारी राष्ट्रांशी भारताचे घनिष्ठ संबंध आहेत, एकमेकांबद्दल आदरही आहे!

मुलींच्या लग्नाच्या वयाचा फेरविचार

मुलींच्या लग्नाच्या किमान वयोमर्यादेचा फेरविचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती मोदी यांनी दिली. कदाचित मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ वर्षे केले जाण्याची शक्यता आहे. मोदींनी भाषणात महिलांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा मांडताना एक रुपयात सॅनिटर पॅड्स उपलब्ध होत असल्याचाही उल्लेख केला. ६ हजार जनौषधी केंद्रातून ५ कोटी महिलांना लाभ होत असल्याचे मोदी म्हणाले. मुली लढाऊ  विमाने चालवून अवकाश भरारी घेत आहेत. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचा सहभाग मोठा आहे. प्रत्येक संधी त्यांनी सत्कारणी लावली आणि देशाची प्रतिष्ठा वाढवली. केंद्र सरकार महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्याही समान संधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन मोदींनी दिले.

धोरणे आणि घोषणा

* एक हजार दिवसांमध्ये ६००० खेडय़ांमध्ये ऑप्टिक फायबरचे जाळे

* लक्षद्वीप बेटे ऑप्टिक फायबरने जोडणार

* लवकरच सायबर सुरक्षा धोरण

* जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघ फेररचनेनंतर विधानसभा निवडणूक

* सीमाभागांतील १७३ जिल्ह्य़ांत ‘एनसीसी’चा विस्तार, कॅडेटना लष्करातर्फे प्रशिक्षण

* १३०० बेटांच्या विकासासाठी धोरण

* संरक्षण साधनसामग्री उत्पादनात आत्मनिर्भरतेला प्राधान्य

* जैवविविधतेच्या संरक्षणाला अग्रक्रम, आशियाई सिंहांसाठी ‘लायन प्रोजेक्ट’

* १०० शहरांतील प्रदूषण कमी करण्यासाठी र्सवकष विशेष मोहीम

& सिक्कीमप्रमाणे लडाखही ‘कार्बन न्यूट्रल’ क्षेत्र बनवणार

नरेंद्र मोदी – ओली यांचा दूरध्वनी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे नेपाळी समपदस्थ के.पी. शर्मा ओली यांनी शनिवारी दूरध्वनीवरून संवाद साधला. नेपाळने मे महिन्यात भारतीय प्रदेशांचा समावेश असलेला नवा राजकीय नकाशा जारी केल्यामुळे दोन्ही देशांचे संबंध तणावाचे झाल्यानंतर पहिल्यांदाच हा उच्चस्तरीय संपर्क होता.

ओली यांनी मोदी यांना दूरध्वनी करून भारत सरकार व भारतीयांना देशाच्या ७४व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून अलीकडेच झालेल्या निवडीबद्दलही त्यांनी मोदी यांचे अभिनंदन केले. मोदी यांनी करोना महासाथीच्या विरोधातील लढय़ात नेपाळला भारत मदत करतच राहील असे ओली यांना सांगितले, तसेच  दोन्ही देशांदरम्यान असलेल्या  सांस्कृतिक संबंधांना उजाळा दिला.