अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकार नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे याबद्दल आता तरी खुलासा करावा असं भाजपाने म्हटलं आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय देत तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसैन यांनी ट्विटवरुन यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “आता सरकारची भूमिका बदलेली दिसत आहे. सुशांतच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडून करण्याचा आदेश आल्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांची भूमिका बदलेली दिसत आहे. संजय राऊत सुशांतबद्दल काय काय वक्तव्य करत होते. या प्रकरणामध्ये आतापर्यंत कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता याचे उत्तर आता महाराष्ट्र सरकारने द्यायला हवं,” असं ट्विट हुसैन यांनी केलं आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयच्या हाती देण्यात यावा असं सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. यासंदर्भातील आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्याचसंदर्भातील याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. या आदेशानंतर आता राजकीय नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हुसैन यांनी ट्विटवर एक व्हिडिओ पोस्ट करत न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे नक्कीच न्याय मिळेल असं म्हटलं आहे. “सीबीआयने चौकशी केल्यानंतर नक्कीच सत्य समोर येईल यावर आमचा विश्वास आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्र सरकार या प्रकरणामध्ये विलंब करत होती ते पाहता आता या प्रकरणामध्ये पूर्ण न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. सुशांतच्या चाहत्यांकडूनही या प्रकरणाची सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी होत होती. त्यामुळे आम्हाला आनंद आहे की न्यायालयाने हा निर्णय दिला. आता सुशांतला खरोखर न्याय मिळेल,” असं हुसैन यांनी म्हटलं आहे.

सुशांतने १४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यापासूनच त्याच्या मृत्यूबद्दल संक्षय व्यक्त केला जात होता. सुशांतच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ माजली होती. त्यातच काही राजकीय व्यक्तींनीदेखील या प्ररकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. भाजपाचे खासदास सुब्रमण्यम स्वामी यांनीही हे प्रकरण सीबीआयकडे दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिल्यानंतर स्वामींनी तीन शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी, “सीबीआय जय हो” असं म्हटलं आहे.