19 October 2019

News Flash

…म्हणून महाआघाडीत काँग्रेसला स्थान नाही, मायावतींनी सांगितले कारण

मायावतींनी पत्रकार परिषदेत १९९६ मधील आणि २०१७ मधील विधानसभा निवडणुकांचा दाखला दिला.

भाजपाप्रमाणेच काँग्रेसचे धोरणही भ्रष्ट असते. दोन्ही पक्षांचे सरकार असताना भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप मायावतींनी केला.

उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे एकत्र आले असून या महाआघाडीत त्यांनी काँग्रेसला स्थान दिलेले आहे. या महाआघाडीत सपा- बसपा प्रत्येकी ३८ जागांवर लढणार आहे. तर दोन जागा महाआघाडीत सामील होणाऱ्या पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. या महाआघाडीत काँग्रेसला स्थान न मिळाल्याने राहुल गांधी यांना एक हादरा बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून महाआघाडीत काँग्रेसला स्थान का दिले नाही, या प्रश्नाचे उत्तर खुद्द मायावती यांनीच दिले आहे.

काँग्रेस- भाजपा एकसारखेच
काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकसारखेच असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. भाजपाप्रमाणेच काँग्रेसचे धोरणही भ्रष्ट असते. दोन्ही पक्षांचे सरकार असताना भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप मायावतींनी केला. सपा- बसपाला काँग्रेससोबत गेल्याचा खास फायदा होणार नाही, काँग्रेससोबत गेल्यावर आमच्या मतांच्या टक्केवारीवर परिणाम होतो. आम्ही त्यांच्यासोबत गेलो नाही की आमची मतांची टक्केवारी वाढते, असे मायावतींनी सांगितले.

त्या निवडणुकांचा दिला दाखला
मायावतींनी पत्रकार परिषदेत १९९६ मधील आणि २०१७ मधील विधानसभा निवडणुकांचा दाखला दिला. १९९७ मध्ये उत्तर प्रदेशात मायावतींनी काँग्रेससोबत आघाडी केली होती. या निवडणुकीत आमची (बसपाची) मते काँग्रेसला मिळाली, पण काँग्रेसची मते आम्हाला मिळाली नाही, असा दावा मायावतींनी केला. तर २०१७ मधील निवडणुकीत अखिलेश यादव यांनी देखील काँग्रेससोबत आघाडी केली, पण सपालाही यामुळे फायदा झाला नाही, याकडे मायावतींनी लक्ष वेधले.

काँग्रेसवर टीका
मायावती पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्यानंतर बहुतांशी वेळा उत्तर प्रदेशसह देशात काँग्रेसचीच सत्ता होती. काँग्रेसच्या राज्यात व्यापारी, दलित, ओबीसी लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. बेरोजगारी आणि भ्रष्टाचारही वाढला होता, असे मायावतींनी सांगितले. सपा- बसपा आघाडीमागे हे कारणही होतेच, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेससोबत भविष्यातही आघाडी नाही
काँग्रेससोबत भविष्यातही आघाडी करणार नाही, असे मायावतींनी स्पष्ट केले आहे. देशभरात काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षासोबत आम्ही आघाडी करुन निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. भाजपाच्या काळात अघोषित आणीबाणी आहे, तर काँग्रेसच्या घोषित आणीबाणी होती. १९७७ मधील निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता, यंदा तसाच पराभव भाजपाचाही होणार आहे, असा अंदाज मायावतींनी वर्तवला.

First Published on January 12, 2019 5:20 pm

Web Title: why congress not included in sp bsp alliance for loksabha election 2019 mayawati tells reason