टाइम या जगप्रसिद्ध मॅगझिनवरची तीन मुखपृष्ठे सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण या मुखपृष्ठांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बुडताना दाखवण्यात आले आहे. वॉशिंग्टन डी.सी. येथील राष्ट्राध्यक्ष कार्यालय या कव्हरवर दाखवण्यात आले आहे. हे कव्हरपेज म्हणजे तीन मुखपृष्ठांची शृंखला आहे.

पहिल्या कव्हरपेजवर Nothing to see here असा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प बसलेले दाखवण्यात आले. त्यानंतर Stormy असा उल्लेख दुसऱ्या कव्हरपेजवर करत ट्रम्प आणि त्यांचे टेबल बुडण्यास सुरूवात झाली आहे असे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर आता तिसऱ्या कव्हरपेजवर डोनाल्ड ट्रम्प पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचे दाखवण्यात आले आहे. या कव्हरपेजवर ट्रम्प यांचा चेहरा गायब झालेला दाखवण्यात आला आहे. ते आपला चेहरा पाण्याबाहेर काढून कसाबसा श्वास घेण्याचा प्रयत्न करत आहेत असे दाखवण्यात आले आहे. तसेच या मुखपृष्ठावर In Deep असा उल्लेख करण्यात आला आहे. या संदर्भातला एक व्हिडिओही टाइमने ट्विट केला आहे.

पाहा व्हिडिओ

दरम्यान ट्रम्प यांचे माजी प्रचारप्रमुख मॅनफोर्ट यांना करचुकवेगिरी, बँक घोटाळा, परदेशी बँक खात्यांची माहिती न देणे या आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले. विशेष वकील रॉबर्ट म्यूलर यांनी अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने केलेल्या हस्तक्षेपाची चौकशी केली होती. त्यात ही दोन प्रकरणेही उघड झाली. ‘‘पॉल मॅनफोर्ट हे चांगले व्यक्ती आहेत. या प्रकरणात माझा संबंध नाही. पण जे घडले ते वाईट आहे’’, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर टाइमने आणलेले मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे. माझ्याविरोधात महाभियोग चालवल्यास अर्थव्यवस्था कोलमडून जाईल आणि सगळे गरीब होतील असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते त्यानंतर या टाइम मॅगझिनचे हे मुखपृष्ठ चांगलेच चर्चेत आले आहे.

तीन मुखपृष्ठांची ही शृंखला ब्रुकलिनचे आर्टिस्ट टिम ओ’ब्रायन यांनी तयार केले आहे. ओ’ब्रायन हे मागील ३० वर्षांपासून टाइम मॅगझीनमध्ये काम करतात. टाइमच्या ९५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुखपृष्ठाची तीन पानांची शृंखला तयार करण्यात आल्याचे ओ’ब्रायन यांनी म्हटले आहे. पहिले मुखपृष्ठ मागील वर्षी मार्च २०१७ मध्ये आणले गेले. त्यानंतर दुसरे मुखपृष्ठ यावर्षी एप्रिल २०१८ च्या अंकात आणले गेले तर यापुढचे मुखपृष्ठ सप्टेंबर महिन्यातल्या अंकावर असणार आहे. या तिन्ही मॅगझिनवरील मुखपृष्ठांची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.