हिंमत असेल तर नथुराम गोडसेला दहशतवादी म्हणून दाखवा असं आव्हान काँग्रेसचे  नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी आज राज्यसभेत दिलं. UAPA विधेयकावर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान कपिल सिब्बल यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

दहशतवादी कुणाला म्हणायचं हे सरकार कसं ठरवणार? जर हाफिज सईद दहशतवादी आहे तर नथुराम गोडसेही दहशतवादी आहे. नथुराम गोडसेला दहशतवादी म्हणायची हिंमत अमित शाह दाखवणार का? असं खुलं आव्हानच कपिल सिब्बल यांनी दिलं आहे. १९४७ पासून आत्तापर्यंत नथुरामला दहशतवादी म्हणण्याची तुम्हा  (भाजपा) कोणाचाही हिंमत झाली नाही असंही सिब्बल यांनी म्हटलं आहे.

माझ्या प्रश्नाचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं की दहशतवादी ठरवण्याचे त्यांचे निकष काय? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नथुरामला दहशतवादी म्हणणार का? तुम्ही अशा माणसांना तुरुंगात डांबलं आहे जे लोक उच्चशिक्षित आहेत. तुम्ही उद्या त्यांना एक नोटिफिकेशन देऊन दहशतवादी घोषित कराल. ज्यांना दहशतवादी घोषित कराल त्यांना लवादाकडे जाण्याचा किंवा अपिल करण्याचा अधिकार आहे. मात्र त्या व्यक्तीला नेमकं कधी घोषित केलं जाणार आणि त्यामागचं कारण काय असेल? याचा उल्लेख विधेयकात दिलेला नाही. तुम्ही एफआयआरनंतर संबंधित व्यक्तीला दहशतवादी ठरवणार की आरोपपत्र दाखल केल्यावर, संपूर्ण सुनावणीनंतर? या सगळ्या मुद्द्यांवर विधेयकात कोणतीही माहिती नाही असंही सिब्बल यांनी म्हटलं आहे.

एखाद्या व्यक्तीचा गुन्हा सिद्ध होईपर्यंत ती व्यक्ती निर्दोष आहे असेच कायदा मानतो. असं असूनही सुनावणी दरम्यान एखाद्या व्यक्तीला दहशतवादी कसं काय ठरवलं जाऊ शकतं? दहशतवादी ठरवण्याचे सरकारचे निकष काय? जसा हाफिज सईद दहशतवादी आहे तसाच नथुराम गोडसेही दहशतवादी आहे. त्याला दहशतवादी म्हणायची हिंमत अमित शाह किंवा भाजपा दाखवणार का? असाही प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला. एखाद्या माणसाला दहशतवादी ठरवताना त्याच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन कसा आहे? हा मुद्दाही महत्त्वाचा आहे असंही सिब्बल यांनी म्हटलं.