“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडू,” असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशमधील मंत्री रघुराज सिंग यांनी केलं आहे. रघुराज यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

“देशात मोदी आणि उत्तर प्रदेशमध्ये योगी आहे. घोषणा देण्याआधी एका विचार करा. कारण तुम्ही वाचणार नाही. जामीनही मिळणार नाही तुम्हाला. भविष्य बिघडवून घेऊ नका,” असा सूचक इशाराही रघुराज यांनी जेएनयू आणि इतर विद्यापिठांमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला.

असाच कारभार चालणार…

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ तसेच अलीगढ मुस्लीम विद्यापिठामध्ये झालेल्या आंदोलनाबद्दल बोलताना रघुराज यांनी नुमाइश मैदानातील सभेमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं. “मुठभर लोक, केवळ एक टक्का लोक आपल्याच देशाचा पैसा खाऊन, आपल्या करातील पैसा खाऊन मुर्दाबादच्या घोषणा देतात. योगी आणि मोदींना तुम्ही जिंवत गडणार तर आम्ही तुम्हाला जिवंत गाडू. मोदी आणि योगीच देश आणि उत्तर प्रदेशचा कारभार पाहतील आणि जसा सध्या पाहतायत तशाच पद्धतीने पाहतील,” असं रघुराज आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

आम्ही कोणालाच सोडणार नाही…

“१०० वर्षापूर्वी ख्रिश्चन धर्माचा इतिहास सापडत नाही. साडे चौदाशे वर्षांपूर्वी मुस्लीमांचा इतिहास सापडत नाही. आपण सर्वजण सतानात धर्माचेच आहोत. आम्ही सर्वांना आपलेच समजतो. मात्र नागरिकत्व सुधारणा कायद्याची गरज पडली ती देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी घेतलेले निर्णय सुधारण्यासाठी. आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही. आम्ही तडजोड करणार नाही. आम्हीच देश चालवणार. आता विरोधकांनी ऐकण्याची क्षमता ठेवली पाहिजे. नाहीतर तुरुंगात पाठवले जाईल. आम्ही कोणालाच सोडणार नाही,” असा धमकी वजा इशाराही रघुराज यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यांना दिला.

…तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही

“पाकिस्तानने आपल्याकडे डोळे वर करुन पाहिल्यास तो देश जगाच्या नकाशावर दिसणार नाही. गोळीचे उत्तर गोळ्याने देऊ. हे मोदी आणि योगी यांचे सरकार आहे. जे कधी कोणाला घाबरले नाही आणि घाबरणार ही नाही. देशाची धर्मशाळा बनू देणार नाही. आता एनआरसी लागू होणार आहे,” असंही राघुराज यांनी सांगितलं.

वेळीच सुधरा नाहीतर…

“मुस्लीम विद्यापिठांना सांगू इच्छितो की आमच्या अलिगडमधील मुस्लीम शांतताप्रिय आहे त्यामुळे वेळीच सुधरा. तुम्ही बेईमान दाऊद इब्राहिमचे पैसे घेऊन आंदोलने करणार, आमच्या अधिकाऱ्यांना, स्थानिक मुस्लीमांना घेरणार. हे चालणार नाही. आम्ही तुम्हाला बेदम मारहाण करु आणि धडा शिकवू,” असंही रघुराज म्हणाले.

जीभ काढून हातात देऊ…

“आमचंच खाणार आणि आमच्यावर डाफरणार. जीभ काढून हातात देऊ. आता काँग्रेसचे राज्य नाही. आम्ही सर्व सुरक्षा यंत्रणांना स्वातंत्र दिलं आहे. आम्ही लष्काराला खूली सूट दिली आहे. कोणी एक मारला तर तुम्ही दहा मारा असं आम्ही सांगितलं आहे. हे मोदी आणि योगींचं सरकार आहे मित्रांनो. मोदी आहे तर शक्य आहे हे लक्षात ठेवा,” असंही रघुराज भाषणाच्या शेवटी म्हणाले.

नुमाइश मैदानामध्ये नागरिकत्व सुधारणार कायद्याला समर्थन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यही उपस्थित होते.