वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) मोदी सरकारवर नाराज असलेला व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्यांची मते स्वतःकडे वळवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास ‘जीएसटी’त बदल केले जातील, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे.

गुजरातसह हिमाचल प्रदेशमध्येही सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशमधील नहान येथे सभा घेतली. वीरभद्र सिंह यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन नरेंद्र मोदी आणि भाजपने टीकेची झोड उठवली आहे. या आरोपांवर राहुल गांधी भाजपला प्रत्युत्तर दिले. भाजपशासित गुजरातपेक्षा हिमाचल प्रदेशमधील परिस्थिती चांगली असल्याचा दावा त्यांनी केला. मोदी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांच्या सोयीप्रमाणे बोलतात. भाजपने सत्तेत येताना दिलेल्या आश्वासनांवर ते काहीच बोलत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

‘जीएसटी’चा फटका बसलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. २०१९ मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास ‘जीएसटी’त बदल केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. जीएसटी ही काँग्रेसचीच संकल्पना आहे, मात्र भाजपने आमच्या जीएसटी विधेयकात मोठ्या प्रमाणात बदल करुन त्याची अंमलबजावणी केली, असा दावाही त्यांनी केला.

केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटी गोंधळ आहे, यात २८ टक्के कराचा समावेश आहे. याशिवाय रिटर्न भरण्याची प्रक्रिया देखील किचकट आहे. यामुळे व्यावसायिक उद्ध्वस्त झाले, असा आरोप त्यांनी केला. ८ नोव्हेंबररोजी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त आम्ही जीएसटीमुळे सर्वसामान्यांना बसलेला फटका हा मुद्दा मांडणार आहोत, असेही ते म्हणालेत. हिमाचल प्रदेशमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी असून शिक्षण, आरोग्य सेवा आणि स्वच्छता या तिन्ही क्षेत्रांमध्ये राज्याने चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. हिमाचलने विकासाच्या बाबतीत गुजरातलाही मागे टाकल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.