सुरक्षेला धोका असेल तर भारत फक्त आपल्या भूमीत राहूनच लढणार नाही, तर परदेशात जाऊनही लढेल, असे विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले आहे. लडाख सीमेवर भारत आणि चीन दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित डोवाल यांनी केलेल्या या विधानाला खूप महत्त्व आहे.

भारताने आतापर्यंत कोणावरही पहिला हल्ला केलेला नाही, हे सुद्धा डोवाल यांनी नमूद केले. “जिथे तुम्हाला हवं, तिथेच आम्ही लढू हे आवश्यक नाही. धोक्याचे जे मूळ उगमस्थान आहे, तिथे जाऊन भारत लढू शकतो” असे अजित डोवाल म्हणाले. ऋषीकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमच्या कार्यक्रमाल अजित डोवाल बोलत होते.

“व्यक्तीगत हितासाठी आपण कधीही कोणावर आक्रमण केलेले नाही. पण आपण आपल्या भूमीवर आणि परकीय भूमीवर सुद्धा निश्चित लढू. पण ती लढाई व्यक्तीगत हितासाठी नसेल, परमार्थ अध्यात्मासाठी असेल” असे डोवाल म्हणाले.

आपण एका सभ्य समाजात राहतो. हा समाज धर्म, भाषा यावर आधारलेला नाही. संस्कृती हा आपल्या देशाचा पाय आहे असे अजित डोवाल म्हणाले. अजित डोवाल हे नागरिक दृष्टीकोनातून बोलत होते. सध्याच्या परिस्थितीत त्यांनी थेट कोणाविरोधात हे भाष्य केलेले नाही, असे सूत्रांनी सांगितले.