रविशंकर यांचा आव्हानात्मक पवित्रा; यमुना नदीच्या क्षेत्रातील कार्यक्रमाला अद्यापही वादाचे ग्रहण
यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात होऊ घातलेल्या आणि एका दिवसावर येऊन ठेपलेल्या तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला लागलेले वादाचे ग्रहण अद्यापही सुटलेले नाही. राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेला ५ कोटी रुपयांचा दंड आपण भरणार नाही, वाटल्यास तुरुंगात जाऊ असे सांगून श्री श्री रविशंकर यांनी आव्हानात्मक पवित्रा घेतला आहे.
या कार्यक्रमावर बंदी घालण्यात यावी यासाठी राष्ट्रीय हरित लवादाला (एनजीटी) साकडे घालणारे पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते मनोज मिश्रा यांनी गुरुवारी पुन्हा लवादाकडे धाव घेऊन, आयोजकांनी पोलीस, अग्निशामक दल व सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या संस्थांकडून आवश्यक त्या परवानग्या न घेतल्याची तक्रार केली.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ गुरू रविशंकर यांनी आपण दंड भरणार नाही असे म्हटले असल्याचेही मिश्रा यांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा, दंडाची रक्कम भरण्यासाठी आयोजकांकडे वेळ असून त्यांनी ती न भरल्यास कायदा त्याचे काम करेल, असे न्या. स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखालील लवादाच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
प्रतिभा, प्रतिष्ठा व नावलौकिक असलेल्या लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक सांस्कृतिक महोत्सवाचे’ उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करण्याचे प्रस्तावित असून, सुमारे ३५ लाख लोक त्यात सहभागी होण्याची आयोजकांना अपेक्षा आहे.
पर्यावरणविषयक नियमांचा भंग होत असल्याच्या काळजीतून उद्भवलेल्या वादांच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या समारोप समारंभातून माघार घेतली आहे. तसेच मोदी शुक्रवारी उद्घाटनाला हजर राहणार की नाही याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
हा कार्यक्रम थांबवण्यात यावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थीसाठी एका स्वयंसेवी संस्थेने अखेरच्या वेळी केलेला प्रयत्न अपयशी ठरला. याचिकाकर्त्यांनी या मागणीसाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे जाण्याची सूचना न्यायालयाने केली.
भारतीय किसान मजदूर समितीने एनजीटीकडे दाद मागावी, असे न्या. टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्यांना सांगितले. या कार्यक्रमाची तयारी अनेक दिवसांपासून सुरू असताना तुम्ही ऐन वेळी न्यायालयात येताय, म्हणजे तुमचा उद्देश केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा आहे, अशी कानउघाडणी त्यांनी केली.

आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही – रविशंकर
राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी संस्थेला ठोठावलेला ५ कोटी रुपयांचा दंड भरण्याऐवजी मी तुरुंगात जाईन, असे रविशंकर यांनी गुरुवारी सांगितले. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. आम्ही निष्कलंक आहोत आणि राहू. आम्ही तुरुंगात जाऊ पण एक दमडीही भरणार नाही, असे त्यांनी सांगितले.
तुम्ही नियमांचे उल्लंघन करणार काय, असे विचारले असता रविशंकर म्हणाले की, मी नियमांचे पालन करीन पण मी काहीही चुकीचे केलेले नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी एकदेखील झाड तोडण्यात आलेले नाही. फक्त काही झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत, तसेच आम्ही जमीन सपाट केली आहे असे त्यांनी सांगितले.
हा कार्यक्रम ‘सांस्कृतिक ऑलिम्पिक’सारखा असून जगभरातील ३७ हजार कलाकार एका व्यासपीठावर येणार आहेत. लोकांना एकमेकांजवळ आणणाऱ्या अशा कार्यक्रमाचे स्वागत करायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.