अमेरिकेकडून इराणची कोंडी करण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणकडून निर्यात करण्यात येणाऱ्या धातूवर निर्बंध घातले होते. त्यानंतर इराणकडून कच्चे तेल विकत घेणाऱ्या देशांना देण्यात आलेली सूटही पूर्णत: बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता इराणला केवळ भारताकडूनच अखेरच्या आशा आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद झारीफ यांनी मंगळवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान भारत आणि इराण यांच्यातील परस्पर द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यात आली. तसेच अफगाणिस्तानसह भारतीय उपखंडातील परिस्थितीवरही एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासहित सहा राष्ट्रांना दिलेली सूट बंद केल्यानंतर झारीफ आणि स्वराज यांच्यात झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

भारताने इराणकडून कच्च्या तेलाची आयात बंद न केल्यास अमेरिका भारतावरही निर्बंध घालू शकतो, अशी धमकी यापूर्वी अमेरिकेकडून देण्यात आली होती. दरम्यान, या बैठकीत चाबहार बंदरावरदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे. चाबहार बंदरासाठी अमेरिकेने दिलेली सूट कायम ठेवणार असल्याचे ट्रम्प प्रशासनाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. झारीफ यांचा यावर्षातील हा दुसरा भारत दौरा आहे. यापूर्वी झारीफ जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर आले होते.

इराणकडून सर्वाधिक कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या देशांमध्ये चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. अमेरिकेच्या निर्बंधांनंतर भारताने इराणकडून कच्च्या तेलाची 4 लाख 52 हजार प्रति बॅरलवरून 3 लाख प्रति बॅरल प्रतिदिवस केली होती.