बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दिवाळी गोड झाली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून एनडीएने १२५ जागा मिळवल्या आहेत. या १२५ जागांपैकी ७४ जागांवर विजय मिळवत भाजपा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नितीश कुमार यांच्या जदयूने ४३ जागांवर तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता नितीशकुमारच बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे स्पष्ट झालं आहे. मात्र हे मुख्यमंत्रीपद पूर्ण कालावधीसाठी म्हणजेच पाच वर्षे दिलं जाईल की त्याबद्दल नवीन चर्चेमधून वाटप केले जाईल यासंदर्भात बिहारमधील भाजपा नेत्यांमध्येच दुमत असल्याचे दिसून येत आहे. याच गोंधळामुळे सध्या जरी मुख्यमंत्री पदाची माळ नितीश यांच्या गळ्यात पडली तरी नंतर बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री बसणार का?, भाजपाने नितीश यांना दिलेलं ते आश्वासन जुमलाच ठरणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात.

भाजपाचे बिहारमधील अध्यक्ष संजय जैस्वाल यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना, “आमच्या पक्षाच्या नेतृत्वानेआधीच नितीश कुमार हे मुख्यमंत्री होतील असं जाहीर केलं आहे. आम्ही सहकारी पक्ष म्हणून काम कऱण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष शाह यांनी एनडीएचे नेतृत्व नितीश कुमार करतील असं सांगितलं होतं. त्यामुळे तोच आमचा निर्णय आहे,” असं स्पष्ट केलं आहे. नितीश कुमार हेच पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील का या प्रश्नाला उत्तर देताना, “अर्थात, जर आमच्या पंतप्रधानांनी तसं म्हटलं आहे तर तेच राहतील,” असं म्हटलं.

आणखी वाचा- Bihar Election Result : ओवैसी ‘वोट-कटर’, धर्मनिरपेक्ष पक्षांनी सतर्क राहावं; काँग्रेसची टीका

मात्र हे बिहारमधील भाजपाध्यक्षांचे मत असले तरी पक्षामधील काही नेत्यांनाच यासंदर्भात शंका आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नितीश कुमार यांच्याविरोधात जतनेमध्ये असणारा रोष दिसून येत होता. याचमुळे एक्झीट पोलमध्येही यंदा नितीश यांना बिहारची जनता संधी देणार नाही असं चित्र दिसत होतं. मात्र निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाच्या सोबतीने असणाऱ्या लढणाऱ्या जदयूने ४३ जागा जिंकल्या आहेत. मात्र भाजपाच्या  ७४ जागांसमोर हा आकडा लहान असून एनडीएमधील भाजपा हा बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार भाजपा नितीश कुमार यांना सार्वजनिक पद्धतीने जाहीर केलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री पदाची खुर्ची देईल मात्र भविष्यात यासंदर्भातील पर्याय खुले ठेवण्यासंदर्भातील सर्व कळाजीही घेईल. “सहा महिने किंवा एक वर्षानंतर या निर्णयाबद्दल फेरविचार केला जाऊ शकतो,” असं या भाजपाच्या नेत्याने म्हटलं आहे. तर भाजपाच्याच अन्य एका नेत्याने, “आमच्या बाजूने यासंदर्भात कुठलाही गोंधळ नसून अंतिम निकालानंतर नितीश यांच्या मनात काय आहे हे स्पष्ट झाल्यावर बघू,” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा- Bihar Election Result : जनतेनं पोकळ आश्वासनं, जातीयवादाच्या राजकारणाला नाकारलं – अमित शाह

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना भाजपाचे नेते संजय पासवान यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात अजूनही वेगळी शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं आहे. “हा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय आहे. मात्र आम्ही दिलेल्या आश्वासनानुसार आम्ही मुख्यमंत्री पदाची खुर्ची नितीश कुमार यांना देणार आहोत. मात्र यासंदर्भात काय निर्णय घ्यायचा हे नितीश कुमार त्यांच्या तत्वानुसार ठरवतील,” असं पासवान म्हणाले आहेत.

भाजपाला जदयूपेक्षा जास्त जागा मिळाल्याने मंत्रीमंडळातील मोठा वाटा हा भाजपाला मिळणार आणि महत्वाची खाती भाजपाच्या वाटल्याला जाणार हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. “मंत्रीमंडळ आणि खातेवाटप हे प्रत्येक पक्षाला मिळालेल्या जागांनुसार ठरवलं जाईल,” असं भाजापाच्या एका नेत्याने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका नेत्याने, “परस्पर सहकार्याने यासंदर्भातील निर्णय घेऊ,” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा- “भाजपा-संघाला सोडा आणि…”; नितीश कुमार यांना काँग्रेसकडून ऑफर

सध्या बिहारमध्ये सत्तेत असणाऱ्या जदयू आणि भाजपा सरकारच्या स्थापनेसाठी नितीश यांनी राजदबरोबरची दोन वर्षांची युती तोडत पुन्हा 2017 मध्ये एनडीएमध्ये येण्याचा निर्णय गेतला होता. या मंत्रीमंडळामध्ये जदयूचे 17 मंत्री तर भाजपाकडे 12 मंत्रीपदांबरोबरच आणि उपमुख्यमंत्री पद होते. सुशील कुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलेलं. मात्र भाजपाकडून दिलेलं आश्वासन पाळलं जाईल अशी शक्यता व्यक्त करणारेही अनेकजण आहेत. महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्तासंघर्षानंतर आपली प्रतिमा जपण्यासाठी भाजपा यंदा मुख्यमंत्री पद वाटून घेण्यासंदर्भात अडवणूक करणार नाही असं मत काही राजकीय जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

भाजपा आणि जदयूमधील विचारांमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. भाजपाने जदयूबरोबर लढण्याचा निर्णय गेतला तेव्हा भाजपाने डबल इंजिनचा जोर लावून निवडणूक जिंकण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र त्याचवेळी सर्वात मोठा पक्ष राहिलेल्या जदयूने सत्तेत असल्यामुळे असणाऱ्या विरोधाचा विचार करत कमी जागा लढवाव्यात असे संकेत सुरुवातीपासूनच दिले होते. याचबरोबरच एलजेपीच्या चिराग पासवान यांनाही नितीश यांच्याविरोधात बंड पुकारले. एलजेपीला कमी जागा मिळाल्या असल्या तरी नितीश यांना मोठं यश मिळून देण्यापासून रोखण्यात एलजेपीचा किती हातभार लागला आहे याची जाणीव बिहारमधील भाजपा नेत्यांना नक्कीच आहे.

आणखी वाचा- “हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…”; फडणवीसांनी मानले बिहारमधील मतदारांचे आभार

जदयूकडे नितीश कुमार यांच्याशिवाय दुसरे पर्यायी नेतृत्व नाहीय. तसेच मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याविरोधात रोष आहे त्यामुळेच जदयूकडे भाजपाच्या अटी मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता असं मत काही जाणकार व्यक्त केला. राष्ट्रीय पक्षांनी स्थानिक पक्षांबरोबर युती करुन त्यांना दुबळं करण्याचं धोरण मागील काही वर्षांपासून अवलंबलं आहे. भाजपाने महाराष्ट्रामध्ये शिवसेना तर पंजाबमध्ये अकाली दलबरोबर युती करुन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही पक्षांनी युती तोडली.

मात्र पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका पाहता भाजपाला जदयूने लहान भावाप्रमाणे सत्ता संभाळावी अशीच अपेक्षा असेल.