सिक्कीमच्या सीमेवरील डोकलामचा वाद मिटल्याला काही काळच उलटला आहे, तोच चिनी सैनिकांनी पुन्हा एकदा या भागात रस्त्याचे काम सुरु केले आहे. यापूर्वी निर्माण झालेल्या वादावेळी चिनी आणि भारतीय सैनिक समोरासमोर आले होते, या ठिकाणाहून रस्त्याचे हे काम १० किमी अंतरावर सुरु आहे. भूतान आणि चीन हे दोन्ही देश डोकलाम आपला भाग असल्याचे सांगतात. यामध्ये भारत भूतानच्या बाजूने आहे. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

जूनमध्ये भारतीय सैनिकांनी सिक्कीममध्ये सीमा ओलांडून चीनकडून सुरु असलेल्या रस्त्याचे काम बंद पाडले होते. हा रस्ता भारतीय भूभागाच्या ‘चिकन नेक’ येथूनच जातो. भारतासाठी हा भूभाग सीमा सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. ‘चिकन नेक’चा भूभाग भारताला ईशान्येकडील राज्यांना जोडतो. या रस्त्याच्या वादावरुन दोन्ही देशांचे सैनिक ७० दिवस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. चीन आणि भारतामध्ये अनेक दशकांनंतर निर्माण झालेला हा मोठा वाद असल्याचे सांगण्यात येते. हा वाद मिटवल्यानंतर दोन्हीही देशांच्या लष्काराने आपापले सैनिक मागे बोलवण्याचा निर्णय घेतला होता.

त्यावेळी चीनने आपले बुलडोझर आणि रस्ता बनवण्याचे इतर सामान हटवल्याचे भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तर, रस्ता बनवण्याचे काम हे हवामानाच्या स्थितीवर अवलंबून असेल, असे चीनी अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

मात्र, आता चीनने नव्याने डोकलाममधील ‘चिकन नेक’पासून १० किमी अंतरावर असणाऱ्या रस्त्याची रुंदी वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. यानुसार त्यांनी या वादग्रस्त डोकलाम पठारावर पुन्हा एकदा आपला दावा मजबूत केला आहे. मात्र, भारतानेही ‘चिकन नेक’पर्यंत पोहोचण्याच्या अशा कुठल्याही कामाला आमचा विरोध असेल असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

या नव्या रत्याच्या सुरक्षेसाठी चीनने ५०० सैनिक या भागात तैनात केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे सैनिक कायमस्वरुपी या ठिकाणी राहतील अशी चिन्हे नाहीत. कारण, त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी येथे कुठलेही बांधकाम करण्यात येत नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे.