पंजाबमधील मुक्तसार जिल्ह्यामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. जमीनीच्या वादातून येथील एका महिलेवर तिच्याच भावाने आणि भाच्याने गोळीबार केला. डोक्यामध्ये गोळ्या लागलेल्या अवस्थेतच या महिलेने सात किलोमीटर गाडी चालवत पोलीस स्थानकात जाऊन आपल्यावर झालेल्या हल्ल्याची तक्रार केली.

काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव सुमीत असे आहे. या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुक्तसार येथील सामेवाली गावातील जमीनीवरुन तिचे भाऊ हरिंद्र सिंग यांच्याशी कडाक्याचे भांडण झाले. या भांडणादरम्यान रागाच्या भरात तिच्या दहावीत शिकणाऱ्या भाच्याने तिच्यावर गोळीबार केला. यावेळी गोळीबारात सुमीतची आई सुखजिंदर कौर या ही जखमी झाल्या आहेत. सुखजिंदर यांच्या पायाला गोळ्या लागल्या आहेत. तर सुमीतच्या डोक्यात तीन गोळ्या लागल्या आहेत.

पोलीस काय म्हणाले?

सुमीत आणि सुखजिंदर या दोघी पोलीस स्थानकात पोहचल्यानंतर त्यांची परिस्थिती पाहून पोलिसांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन या दोघांच्या शरीरामधील गोळ्या काढल्या आहेत. दोघीही सध्या सुखरुप आहे. पोलीस स्थानकाचे प्रमुख अधिकारी कृष्णा सिंग यांनी, “हल्ला झाल्यानंतर या दोघी पोलीस स्थानकात आल्या तक्रार दाखल करायला आल्या होत्या. आम्हीच रुग्णवाहिकेला फोन करुन या दोघांनी रुग्णालयात दाखल केले,” अशी माहिती दिली.

डॉक्टर काय म्हणाले?

या दोघींच्या शरीरामधून गोळ्या काढणाऱ्या डॉक्टर मुकेश बन्सल यांनी या दोघींना पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याचे सांगितले. “तीन गोळ्या डोक्यात लागल्यानंतरही ही महिला वाचली हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. गोळ्यांमुळे तिच्या कवटीला छिद्र पडली मात्र त्या सुदैवाने गोळ्या मेंदूत गेल्या नाही. तिच्या जिवाला आता काहीच धोका नाही,” असं डॉक्टर बन्सल म्हणाले.

तक्रारीत काय सांगितले?

सुमीतने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये जमीनीच्या वादातून गोळीबार झाल्याचे म्हटले आहे. “आमच्याकडे ४० एकर जमीन आहे. माझ्या वडीलांच्या निधनानंतर माझी आई, भाऊ आणि मला प्रत्येकी १६ एकर जमीन वाट्याला आली. मात्र माझ्या भावाला संपूर्ण जमीन हवी होती. म्हणून त्याने त्याच्या मुलाला आम्हाला ठार मारण्यासाठी पाठवले,” असा दावा सुमीतने तक्रारीमध्ये केला आहे.

“माझ्या मुलाने जमीनीच्या वादावरुन याआधीही आमचा झळ केला होता. देवाची कृपा असल्याने गोळ्या लागल्यानंतरही आम्ही या हल्ल्यामधून बचावलो. आम्हाला न्याय हवा आहे,” असं सुमीतची आई सुखजिंदर यांनी सांगितलं. या प्रकरणात पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी दोघांचाही शोध सुरु केला आहे.