गो एअर (GoAir) कंपनीच्या विमानाने चक्क प्रवाशांचे सामान न घेताच उड्डाण केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. रविवारी गो एअरच्या श्रीनगर येथून जम्मू जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला. विमान जम्मूला पोहोचल्यानंतर प्रवाशांच्या ही बाब लक्षात आली, त्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

या विमानातील एक प्रवासी अब्दुल हामिद याने जम्मूवरून फोन करून ‘पीटीआय भाषा’ला या संदर्भातील माहिती दिली. आम्ही गो एअरच्या जी8-213 या विमानाने हे श्रीनगरवरून जम्मूला पोहोचलो. मात्र, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आमचे सामान विमानात चढवलेच नाही. प्रवाशांनी सामानाची विचारणा केल्यानंतर थोडावेळ वाट पाहायला सांगण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या विमानाने त्यांचं सामान जम्मूमध्ये आणलं जाईल असं त्यांना सांगण्यात आलं. एक तासाहून जास्त वेळ वाट पाहिल्यानंतर उद्या येवून सामान घेवून जा असं उत्तर गो एअरकडून देण्यात आलं.

गो एअरचं स्पष्टीकरण –
सामान चढवण्याच्या नियमांमुळे काही प्रवाशांचं सामान विमानात चढवण्यात आलं नव्हतं. श्रीनगरमध्ये रविवारी खराब हवामान होतं, त्यामुळे बराच वेळ विमानतळावर ताटकळत बसलेल्या अनेक प्रवाशांना दुसऱ्या विमानातून नेण्यात आलं. काहींचं सामान वेगळ्या विमानाने आणण्यात आलं, तर उर्वरित प्रवाशांचं सामान त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, प्रवाशांना झालेल्या नाहक त्रासाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत, असं स्पष्टीकरण गो एअरकडून देण्यात आलं आहे.