बस प्रवासात एका महिलेच्या बॅगेतून २३ लाख रुपयांच्या हिऱ्याच्या बांगडया गहाळ झाल्या. ज्वेलरी डिझायनर असलेली ही महिला या बांगडया एका ग्राहकाकडे सुपूर्द करण्यासाठी त्रिचीहून चेन्नईला चालली असताना ही धक्कादायक घटना घडली. तारा चांद (५५) ही महिला सरकारी बसमधून चेन्नईला येत होती.

कोयामबीडू येथील सीएमबीटी पोलीस स्थानकात बॅगेतून बांगडयांचा बॉक्स गहाळ झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या बॉक्समध्ये २३ बांगडया होत्या. नऊ मे रोजी ही घटना घडली. हिरे कोरलेल्या सोन्याच्या बांगडया बनवण्याची आपल्याला ऑर्डर मिळाली होती. या बांगडया ग्राहकाकडे सुपूर्द करण्यासाठी आपण त्रिचीहून बसने चेन्नईला चाललो होतो.

सीएमबीटी येथे पोहोचल्यानंतर बॅग तपासली. त्यावेळी सोन्याच्या बांगडयांनी भरलेला बॉक्स बॅगमध्ये नव्हता. २३ लाख रुपये या बांगडयांची किंमत होती असे तिने तक्रारीत म्हटले आहे. तारा सेमी स्लीपर बसमधून प्रवास करत होत्या. त्यांनी डोक्याच्यावर असणाऱ्या रॅकवर सामान ठेवले होते. पोलिसांनी तपास सुरु केला असून त्रिची की, चेन्नईमध्ये या बांगडयांची चोरी झाली याबद्दल आम्हाला आता सांगता येणार नाही असे पोलिसांनी सांगितले.