पुराच्या पाण्यात सेल्फी काढताना महिला आपल्या मुलीसोबत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर येथे ही घटना घडली आहे. भरुन वाहणाऱ्या कालव्याजवळ फोटो काढण्यासाठी दोघी गेल्या असताना ही दुर्घटना घडली. सकाळी ७.३० वाजता ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कॉलेजमध्ये प्रोफेसर असणारे आर डी गुप्ता आपली पत्नी बिंदू गुप्ता आणि मुलगी अश्रीतीसोबत घराजवळ पाण्याने भरुन वाहणारा कालवा पाहण्यासाठी गेले होते.

यावेळी कालव्यावर असणाऱ्या पुलावर उभं राहून बिंदू गुप्ता मुलीसोबत सेल्फी काढत होत्या. यावेळी पुलाचा काही भाग कोसळल्याने दोघी पाण्यात पडल्या आणि वाहून गेल्या. दोघींचे मृतदेह सापडले आहेत. “दोघी पाण्यात पडताच स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण अपयश आलं. नंतर शोध घेतला असता दोघींचे मृतदेह हाती लागले”, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक हितेश चौधरी यांनी दिली आहे.

काही तासांनी अजून एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली. ५० वर्षीय दूधविक्री करणारे बापुलाल अफजलफूल येथील नाल्यात वाहून गेले. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे.