दिल्लीमधील बुराडी सामूहिक मृत्यू प्रकरणाचं गूढ उकलताना दिसत आहे. महिला तांत्रिक गीता माँला पोलिसांनी अटक केली असून तिने आपणच त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची कबुली दिली आहे. सीएनएन न्यूज १८ ने यासंबंधी वृत्त दिलं आहे. बुराडी परिसरात भाटिया कुटुंबातील ११ जणांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. अंधश्रद्धेपायी कुटुंबाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय होता. एका स्टिंग व्हिडीओत गीता माँने आपण शनिवारी कुटुंबाला भेटणार होतो असं सांगितलं होतं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली क्राइम बांचने यानंतर गीता माँ आणि कुटुंबात काही संबंध होते का याचा तपास सुरु केला होता. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती. अखेर तिने गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी अटक केली आहे.

स्टिंग व्हिडीओत काहीजण गीता माँकडे मदत हवी असल्याचं नाटक करत बुराडी मृत्यू प्रकरणी प्रश्न विचारत होते. यावेळी गीता माँ सांगताना दिसत होती की, ‘आपण कधीच कुटुंबाला भेटलो नव्हतो, पण वडिलांमुळे त्यांची ओळख होती. कुटुंबाला आपल्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शनिवारी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती’. कुटुंब राहत असलेल्या घराचं बांधकाम महिलेच्या वडिलांनी केलं आहे. पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे गीता माँला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती.

बुराडी सामूहिक मृत्यू प्रकरणाने देशभरात खळबळ माजली आहे. भाटिया कुटुंबातील ११ जणांचा मृतदेह आढळल्यानंतर प्रकरण उजेडात आलं होतं. यामधील १० जणांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत तर ७७ वर्षीय नारायणी देवी यांचा मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळला. अंधश्रद्धेतून कुटुंबाने आत्महत्या केल्याचा संशय असून मुलगा ललित यामागील मास्टरमाइंड असल्याचा संशय आहे. मृतांमध्ये ललितदेखील होता.

मृतांची नावे – नारायण देवी (७७), त्यांची मुलगी प्रतिभा (५७), दोन मुलं भावनेश (50) आणि ललित भाटिया (४५), भावनेशची पत्नी सविता (४८) आमि त्यांची तीन मुलं मीनू (२३), निधि (२५) आणि ध्रुव (१५), ललित भाटियाची पत्नी टीना (४२) आणि त्यांचा १५ वर्षीय मुलगा शिवम , प्रतिभाची मुलगी प्रियंका (३३). प्रियंकाचा गेल्या महिन्यात साखरपुडा झाला होता. वर्षाच्या शेवटी तिचं लग्न होणार होतं.