आग्र्यामध्ये माकडाने १२ दिवसाच्या मुलाला आईच्या मांडीवरुन खेचून नेल्याची घटना ताजी असतानाच येथील कागरौल भागात एका ५९ वर्षीय महिलेचा माकडाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. भुरान देवी असे मृत महिलेचे नाव आहे. सोमवारी रात्री भुरान देवी विश्रांतीसाठी शेतावर चाललेल्या असताना माकडांच्या घोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला.

भुरान देवी खाली कोसळल्यानंतरच माकडांनी त्यांना सोडले. माकडांच्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या भुरान देवी यांना जागेवरुन हलताही येत नव्हते इतक्या वाईट पद्धतीने माकडांनी त्यांना जखमी केले होते. त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले पण मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दोन दिवसांपूर्वी आग्र्यामध्येच माकडाने केलेल्या हल्ल्यात बारा दिवसाच्या मुलाचा मृत्यू झाला. माकडाने मुलाला आईच्या मांडीवरुन खेचून नेले. आरुष असे मृत मुलाचे नाव आहे. आरुषचा मृतदेह शेजारच्या घराच्या छतावर सापडला. राष्ट्रीय महामार्ग दोन जवळील रनकाटा भागातील काचहारा ठोक कॉलनीमध्ये ही घटना घडली.

जेव्हा ही घटना घडली तेव्हा आरुष आईच्या मांडीवर होता. आरुषचे वडील योगेश रिक्षा चालक आहेत. या घटनेबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. आई बाळाला स्तपान देत असताना अचानक माकड घरात शिरले व बाळाच्या मानेला पकडून खेचून नेले. हा सर्व प्रकार नेहाच्या लक्षात येण्याआधीच माकड मूलाला घेऊन पसार झाले होते.