प्राथमिक शाळेत महिला शिक्षिकाच जास्त असतात… वर वर पाहता अतिशय सोपा वाटणाऱया या प्रश्नाच्या उत्तराच्या पर्यायाने नवाच वाद निर्माण केला. विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतलेल्या ‘नेट’च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या या प्रश्नाला चार पर्याय देण्यात आले होते. त्यापैकी एक पर्याय वादग्रस्त ठरला. महिला कमी पगारामध्ये उपलब्ध होतात, असा पर्याय या प्रश्नाच्या उत्तरासाठी देण्यात आला होता आणि याच पर्यायावरून आता वाद निर्माण झालाय.
‘नेट’च्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करणाऱयांनी या प्रश्नाच्या उत्तरासाठी दिलेला पर्याय हा लिंगभेदाला प्रोत्साहन देणारा असल्याचे मत काही परीक्षार्थींनी व्यक्त केले. तर काही जणांनी या स्वरुपाचे प्रश्न आणि त्याचे विचित्र पर्याय देण्याची विद्यापीठ अनुदान आयोगाची आणि प्रश्नपत्रिका तयार करणाऱयांची परंपराच असल्याचे म्हटले.
याच प्रश्नपत्रिकेमध्ये आणखी एक बुचकळ्यात टाकणारा पर्याय असलेला प्रश्न विचारण्यात आला होता. भारताने द्विपक्षीय व्यवस्था स्वीकारली पाहिजे, या प्रश्नाला होय, त्यामुळे स्थिर सरकार देता येईल आणि नाही, त्यामुळे मतदारांच्या निवडीवर बंधने येतील, असे दोन पर्याय देण्यात आले होते. काही परीक्षार्थींच्या मते हे दोन्ही पर्यायातून नेमकेपणा दिसत नाही. त्यामुळे त्यापैकी कोणता बरोबर हे ठरवता येणार नाही.