ओडिशातील कियोंझार जिल्ह्यात एका महिलेला तिच्या पतीच्या अंत्यसंस्कारासाठी पोटच्या मुलांना गहाण ठेवावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ ५ हजारांसाठी या महिलेने आपल्या पोटच्या मुलांना गहाण ठेवले. येथील गधुली गावात राहणाऱ्या आदिवासी समाजातील सावित्री नायक या महिलेचा पती राईबा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. अखेर २६ जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला होता. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सावित्रीकडे पैसे नव्हते. तिने अनेकजणांकडे मदत मागून पाहिली. मात्र, कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही. अखेर सावित्रीने नाईलाजाने तिचा १३ वर्षांचा मुलगा मुकेश आणि ११ वर्षांच्या सुकेशला पाच हजारासाठी गहाण ठेवले व त्यामधून मिळालेल्या पैशातून पतीवर अंत्यसंस्कार केले. इतके दिवस होऊनही ही घटना उघडकीस आली नव्हती. या भागातील स्थानिक गटविकास अधिकारी नायक बुधवारी गावात आल्यानंतर त्यांना याप्रकराची माहिती मिळाली.