भारतात तालिबानची हिंदू आवृत्ती यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी शनिवारी दिला. नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी टीकेची झोड उठवली. सिंग यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, तालिबानसह विद्वेषाची विचारसरणी मानणाऱ्यांचा तालिबानसह आपण निषेध करतो, भारतात आम्ही तालिबानची हिंदू आवृत्ती चालू देणार नाही हे ध्यानात ठेवा.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा वारसा सांगण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, आता नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांचा वारसा सांगितला यापुढे ते चंद्रशेखर आझाद व भगत सिंग हे संघाचे प्रचारक होते असे म्हणायला कमी करणार नाहीत. पटेल यांचा वारसा सांगताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोठय़ा व्यक्तींना सहज बाजूला टाकले व पटेल यांचा वारसा सांगून मोकळे झाले. मोदी व भाजपने पटेल यांचा वारसा सांगून पटेल हे जातीयवादी होते असे भासवण्याचा प्रयत्न केला. जातीय शक्तींचा स्वातंत्र्यसेनानी म्हणून सरदार पटेल यांची प्रतिमा खराब करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते गोळवलकर, दीनदयाळ उपाध्याय व श्यामाप्रसाद मुखर्जी यांची नावे घेतली नाहीत, त्यांना सोडचिठ्ठी देऊन, आता वल्लभभाई पटेल यांचा वारसा सांगत फिरत आहेत. मोदींच्या इतिहासाविषयीच्या अज्ञानाची टर उडवताना त्यांनी पाटणा येथे मोदींनी केलेल्या वक्तव्यातील अनेक चुका दाखवल्या. मी मोदींना दोष देत नाही. रा. स्व. संघ हे पसरवित आहे त्यांना इतिहास वेगळा दिसतो, असे दिग्विजय सिंग यांनी म्हटल़े
पुणे येथील कार्यक्रमात गायिका लता मंगेशकर यांनी मोदी यांची स्तुती केल्याच्या विधानावर मोदी यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही. लता मंगेशकर या भारताच्या आदर्श आहेत त्यांना राजकीय मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे व आम्ही त्यांच्या गाण्यांवर नेहमी प्रेमच केले आहे, असे दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे.