‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बैठकीनिमित्त दावोसमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरातील विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. भारताचा विकास आणि देशातील गुंतवणुकीच्या संधी याबाबत मोदींनी सीईओंना माहिती दिली.

दावोस येथे सोमवारपासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ४८ व्या वार्षिक सभेला सुरुवात झाली. गेल्या २० वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांनी या परिषदेला हजर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. दावोसमध्ये पोहोचल्यावर मोदींनी जागतिक कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा केली. भारतातील गुंतवणुकीबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिली. भारत हा गुंतवणुकीसाठी पोषक आणि उद्योगस्नेही देश आहे, याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न मोदींनी केला.  महिंद्रा समुहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी देखील या बैठकीबद्दल ट्विट केले.

सीईओंसोबत बैठक घेण्यापूर्वी मोदींनी स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अॅलेन बेर्सेत यांची देखील भेट घेतली. द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अॅलेन बेर्सेत यांनी देखील ट्विटरवरुन या भेटीविषयी माहिती दिली.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी दावोसमध्ये भाषण होणार आहे. मोदींसह वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य वरिष्ठ सरकारी अधिकारीही या परिषदेसाठी दावोसला गेले आहेत.

जागतिक पातळीवर अनेक कंपन्यांचे सीईओ आणि गुंतवणूकदार सरकार कोणत्या सुधारणांचे संकेत देत आहे त्याकडे लक्ष ठेवून आहेत, असे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोदींच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे मोदी दावोस येथे गेले असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताला दिलासा दिला होता. २०१८-१९ मध्ये भारताचा विकासदर ७.४ टक्के राहील, असे भाकीत आयएमएफने वर्तवले आहे.