आज स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांचे कौतुक केले. भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांना सैन्याने त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले असे मोदींनी सांगितले. “भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे आमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. आमचे जवान काय करु शकतात, ते संपूर्ण जगाने लडाखमध्ये पाहिले आहे” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आणखी वाचा- करोना लसीबद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

“LoC पासून LAC पर्यंत, ज्यांनी कोणी भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले, त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळाले. भारताच्या संप्रभुतेच्या रक्षणासाठी संपूर्ण देशामध्ये जोश भरलेला आहे” असे मोदींनी सांगितले. दहशतवाद असो किंवा विस्तारवाद भारत ठामपणे त्याचा मुकाबला करत आहे असे मोदी म्हणाले. त्यांनी नाव न घेता चीन-पाकिस्तान दोघांना टोला लगावला.

आणखी वाचा- ‘मेक इन इंडिया’नंतर ‘मेक फॉर वर्ल्ड’, पंतप्रधान मोदींचा नवा नारा

“शांतता आणि सौहार्दासाठी भारताचे जितके प्रयत्न आहेत, तितकाच भारत मातृभूमीच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत १८४ देशांनी यूएनमधील आपल्या दाव्याचे समर्थन केले याकडे मोदींनी लक्ष वेधले. देश मजबूत आणि आत्मनिर्भर असेल तेव्हाच हे शक्य होते” असे मोदी म्हणाले.