मॅगी प्रकरणानंतर ‘बेबी फूड’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘सेरेलॅक’मध्ये आता जिवंत अळ्या सापडल्याने नेस्लेच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोईम्बतूर येथील एका ग्राहकाने आपल्या मुलासाठी खरेदी केलेल्या ‘सेरेलॅक’च्या पाकिटामध्ये हा प्रकार आढळला आहे.
कोईम्बतूर येथील श्रीराम यांनी रविवारी आपल्या एक वर्षांच्या चिमुरडय़ासाठी औषधांच्या दुकानातून सेरेलॅक विकत घेतले होते. मुलाला भरविण्यासाठी त्यांच्या पत्नीने पाकीट उघडले असता त्यात जिवंत अळ्या दिसून आल्याने त्यांना धक्काच बसला. याबाबत अन्नसुरक्षा खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. अधिकाऱ्यांनी पाकीट ताब्यात घेत नेस्ले कंपनीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचे अन्नसुरक्षा खात्याचे अधिकारी काथीरावन यांनी सांगितले.
दरम्यान, नेस्लेने याप्रकरणी चौकशी सुरू केली असून आपल्या उत्पादनांच्या सुरक्षा आणि दर्जाबाबत कंपनी सदैव तत्पर राहील, असे स्पष्ट केले आहे. तसेच चौकशी यंत्रणेला आपण सहकार्य करत असल्याचे स्पष्ट केले आहे.