भारत-चीन धुमश्चक्रीत २० जवान शहीद झाल्याने तणावाचे केंद्र ठरलेल्या पूर्व लडाखच्या काही ठिकाणांहून चीनने सोमवारी सैन्यमाघारीस सुरुवात केली. चीनचे सैन्य दीड किलोमीटपर्यंत मागे सरकल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे तेथील तणाव निवळू लागल्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही देशांत लष्करी पातळीवर झालेल्या चर्चेत सैन्य माघारीवर मतैक्य झाले होते. त्याचबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात रविवारी दूरध्वनीवर चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात आले.

भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगट हिने चिनी सैन्याच्या माघारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. “प्रतिस्पर्धी नमतं घेतो, नमवणारा पाहिजे! मागे हटतो, हटवणारा पाहिजे!! पर्वतासारखा मजबूत नेता.. नरेंद्र मोदी पाहिजे!!!”, असे ट्विट तिने केले. तसेच #चीन_पीछे_भाग_रहा_है हा हॅशटॅगही वापरला.

पण त्या ट्विटवरून तिला ट्रोल करण्यात आलं.

चिनी बाजूकडे रविवारी सायंकाळी काही हालचाली सुरू होत्या. त्यावरून माघारीची प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसत होते. आता त्यांनी संरक्षक बांधकामही पाडले असून ती जागा मोकळी झाली आहे. सैनिकांना माघारी नेण्यासाठी काही लष्करी वाहनांच्या हालचालीही दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याशी दूरध्वनीवर रविवारी चर्चा केली. त्यात दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले. डोभाल व वँग हे सीमाप्रश्नी दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधी आहेत. त्यांच्यात ही चर्चा झाली.

भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखमधील तणावामुळे गेले आठ आठवडे पेच सुरू असून पँगॉग त्सो, गलवान खोरे, गोग्रा हॉट स्प्रिंग या ठिकाणी चीनच्या सैन्याने घुसखोरी केली होती. चीनच्या लष्कराने सोमवारी सीमेवरून माघारी सुरू केली असून गलवान खोरे व गोग्रा हॉट स्प्रिंग भागातून सैन्य माघारी घेण्यास चीनने सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव कमी करण्यासाठी भारत व चीन या दोन्ही देशांनी हा निर्णय घेतला.