देशाच्या जीडीपीत झालेली घसरण, बिघडती अर्थव्यवस्था यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधणारे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हांवर अजूनही भाजपकडून टीका केली जात आहे. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी सिन्हा यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची भेट घेतल्यावरून सिन्हा यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्या सुप्रियो यांनी सिन्हा हे देशद्रोही असल्याचा आरोप केला आहे. सुप्रियो यांनी एक ट्विट केले असून ते (यशवंत सिन्हा) हे एका देशद्रोहीसारखे आहेत. काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना भेटण्याशिवाय त्यांच्याकडे कोणते काम नाही, असे म्हटले आहे.

यापूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये त्यांनी यशवंत सिन्हाजी हे काय करत आहात तुम्ही ? त्यांच्याकडे भाजपला देण्यास काहीही नाही पण आमच्यासारख्या नव्या पिढीकडे प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्यासाठी संपूर्ण अधिकार आहेत. आमचं नुकसान का करत आहात?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नेटिझन्सनीही सुप्रियो यांना उत्तर देत त्यांच्या वक्तव्याला विरोध केल्याचे दिसले. यशवंत सिन्हांना बोलण्याइतपत तुमची पात्रता आहे का बाबूल. तुम्ही तर पुढच्या वेळी संसदेत याल की नाही हेही सांगता येणार नाही. याचवेळी चुकून आलात, असे म्हणत एक युजरने टोला लगावला.